उमरगा : तालुक्याच्या सीमावर्ती भागातील तुरोरीसह परिसरामध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे शेतातील काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, तसेच केळी व पानमळ्याचे मोठे नुकसान झाले.
मागील चार दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण असून, चिंचकोट, मळगी, मळगीवाडी, गुरुवाडी, दगड धानोरा परिसरात रविवारी रात्री जोरदार पाऊस पडला. सोमवारी तुरोरी, मुळज, कुन्हाळी, तलमोड, कोळसूर, जगदाळवाडी, कराळी आदी गावांमध्ये वादळी वारा व गारांसह मोठा पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबा जमिनदोस्त झाला असून, केळीच्या बागा व पानमळ्यांचेही नुकसान झाले आहे. तुरोरी येथील संतराम बळीराम भोसले यांनी यंदा लागवड केलेल्या केळीच्या बागेलाही मोठा फटका बसला. अनेकांच्या रानात उभी असलेली ज्वारी आडवी झाली.
चौकट.......
येणेगूर परिसरातही फळबागांना फटका
(फोटो : देविसिंग राजपूत १२)
येणेगूर : रविवारी संध्याकाळी येणेगूर परिसरातील दाळींब, सुपतगाव, नळवाडी, महालिंगरायवाडी, येणेगूर गावांस मेघगर्जनेसह वादळीवाऱ्यांनी आलेल्या अवकाळी पावसाने सुमारे अर्धा तास झोडपले. या वादळी वाऱ्याने फळबागांचे विशेषतः आंबा बागेचे मोठे नुकसान झाले. आंबा गळाल्याने बागायतदार शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अचानक संध्याकाळी ढग जमा होऊन वादळी वारे सुरू झाले. यामुळे ज्वारीच्या राशी करण्यात मग्न असलेल्या शेतकरी, मजूर वर्गाची त्रेधातिरपीट उडाली. काही शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील पत्रे उडाल्याने जनावरांना उघड्यावरच बांधण्यात आले.