'तेरणा'बाबत ३१ जानेवारीपूर्वी निर्णय घ्या; डीआरटी कोर्टाला औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 02:28 PM2022-01-11T14:28:33+5:302022-01-11T14:29:39+5:30
अडथळ्यांची शर्यत पार करीत तेरणा शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठीची परवानगी मिळविण्यात जिल्हा बँकेला यश आले.
उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल प्रकरणात कर्ज वसुली न्यायाधिकरण (डीआरटी) कोर्टाने ३१ जानेवारीपूर्वी निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
अडथळ्यांची शर्यत पार करीत तेरणा शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठीची परवानगी मिळविण्यात जिल्हा बँकेला यश आले. यानंतर निविदा काढण्यात आली. सुरुवातीच्या काही फेऱ्यात काही संस्थांनी निविदा घेतल्या. परंतु भरल्या नाहीत. दर कमी केल्यानंतर सोनारी येथील भैरवनाथ शुगरसह ट्वेन्टी वन शुगरने सहभाग घेतला. परंतु, निविदा विहित वेळेत न आल्याचे कारण देत बँकेने ट्वेन्टी वनची निविदा स्वीकारली नाही. बँकेच्या विरोधात ट्वेन्टी वनने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.
खंडपीठात या प्रकरणी सुनावणीअंती त्यांना डीआरटी कोर्टात जाण्यास सांगितले होते. त्यानुसार ट्वेन्टी वनने डीआरटी कोर्टात धाव घेतली. १५ जानेवारीपर्यंत बँकेने कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश दिले. या आदेशाला भैरवनाथ शुगरने औरंगाबाद हायकोर्टात आव्हान दिले. सोमवारी सुनावणी झाली असता, ३१ जानेवारीपूर्वी भैरवनाथ शुगर आणि ट्वेन्टी वन शुगर यांच्यातील प्रकरण निकाली काढावेत, असे आदेश दिले.