उस्मानाबाद : जनतेचा जीव महत्त्वाचा असून, राजकारणापेक्षा कोरोनाला पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मैदानात उतरलो आहोत. संपूर्ण प्रशासन चांगले काम करीत असून, सर्वांच्या प्रयत्नाने आपण कोरोनावर मात करणार असल्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.गडाख उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख आले होते. त्या वेळी त्यांनी वाशी, तेरखेडा व कळंब येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांची चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला; तसेच प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आरोग्याच्या सोईसुविधांची पाहणीही त्यांनी केली.आरोग्य विभागाला असलेल्या अडचणींची माहिती घेऊन त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले; तसेच प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाविरुद्धची ही लढाई दीर्घ काळ चालेल. कोरोनाविरोधातील लस अद्याप तयार झालेली नाही. तरी ज्या नागरिकांना पूर्वीचे काही गंभीर आजार असतील, त्या नागरिकांनी तर अत्यंत काळजी घ्यावी व विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
राजकारणापेक्षा कोरोनाला हरविणे महत्त्वाचे- शंकरराव गडाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 3:13 AM