पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती
भूम - तालुक्यातील रामकुंड येथे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला ताेंड द्यावे लागत असून, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कुंथलगिरी तलावातून या गावाला पाणी पुरवठा होतो. परंतु, पाणी पुरवठ्याचे विद्युत कनेन्शन बंद केल्याने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे.
वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीती
भूम - शहरातील एस. पी. कॉलेज परिसर ते शासकीय विश्रामगृह परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
तेर परिसरात थंडी वाढली
तेर - गेल्या दोन-तीन दिवसांपासून तेर परिसरातील गावांमध्ये थंडी वाढली आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा गरम कपडे वापरत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी काळजी घेताना दिसून येते आहेत.
हरभरा काढणीस आला वेग
तेर - तेर परिसरातील काही गावांमधील शेतीशिवारात हरभरा काढणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतशिवारात शेतकरी हरभरा काढणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
कोण होणार सरपंच गावागावात चर्चा वाढली
तेर - नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. परंतु, सरपंच व उपसरपंच कोण होणार याबाबत परिसरातील गावांमध्ये पारावर चर्चा रंगली आहे.
(सिंगल फोटो - अजित चंदनशिवे ०३)
गार्गी कावरे हिचे यश
तुळजापूर - स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आयोजित शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे विभागीय चित्रकला स्पर्धेत म. वि. रा. शिंदे प्रशालेची विद्यार्थिनी गार्गी महेंद्र कावरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तिला सेवानिवृत्त शिक्षक पद्माकर मोकाशी, सहशिक्षक सतीश हुंडेकर, सुप्रिया कावरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गार्गीच्या चित्राची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गतिराेधक बसविण्याची मागणी
कसबे तडवळा - उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेलगतच्या लातूर - बार्शी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्त्यालगतच शाळा, बसस्थानक असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.