उस्मानाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांनी आपली भूमिका मांडली. भाजप व छत्रपती राजेंची भूमिका एकच असून, आम्ही त्याचे समर्थन करतो व पाठिंबाही देतो. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या ५ मागण्या अजूनही अधांतरीच ठेवण्यात आल्या आहेत. यामागील शुक्राचार्य कोण, असा सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या ५ मागण्यांबाबत आर्थिक तरतुदीसह कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, ही अपेक्षा आहे. सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांना योग्य आर्थिक तरतूद, गरीब मराठा समाजाला ओ.बी.सी.च्या सवलती देणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, २१८५ निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी, या संदर्भातील मागण्या समाजासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. या सर्व मागण्या संपूर्णतः राज्य सरकारच्या अखत्यारित असून फडणवीस सरकारने या बाबी कृतीत आणल्या होत्या. आताचे लोकशाहीतील राजे यावर कार्यवाही का करत नाहीत?, राज्य सरकारमधील झारीतील शुक्राचार्य नेमके कोण आहेत, असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे.
राज्य सरकारने ३४२(अ) प्रमाणे परिपूर्ण अहवाल राज्यपालांकडे पाठविणे आवश्यक आहे. राज्य सरकारने त्यांच्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण केल्यानंतर केंद्राचा विषय येतो. राज्याने अगोदर विशेष अधिवेशन बोलवावे व त्यांच्या अखत्यारितील कार्यवाही पूर्ण करावी, त्यानंतर केंद्राकडील कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी भाजपची असून, ती तत्परतेने पार पाडू, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.