हक्काच्या पैशासाठी दिव्यांगांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 01:30 PM2020-10-05T13:30:54+5:302020-10-05T13:32:44+5:30
ग्राम पंचायतीकडून दिव्यांगांसाठी असलेला निधी वितरित केला जात नसल्याने येणेगूर येथील दिव्यांग बांधवांनी सोमवारपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
येणेगूर (जि. उस्मानाबाद) : ग्राम पंचायतीकडून दिव्यांगांसाठी असलेला निधी वितरित केला जात नसल्याने येणेगूर येथील दिव्यांग बांधवांनी सोमवारपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. येणेगूर येथे ५५ दिव्यांगांची नोंद असून यात १५ महिलांचा समावेश आहे. येथील ग्रामपंचायतीने यंदाचा ८१ हजार १८१ रुपये निधी अद्यापही दिव्यांगांना वाटप केला नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचे संघटनेचे अध्यक्ष नागेश धामशेट्टी, मलंग येळीकर व तालुका अध्यक्ष शेखर मुलगे, नागेश धामशेट्टी, इसाक शेख यांनी सांगितले.
यासंदर्भात उपसरपंच वैभव बिराजदार, ग्रामविकास अधिकारी परमेश्वर डावरे व सदस्य दिलीप येडगे यांच्याशी संपर्क साधला असता वसुली होत नसल्याने निधी वाटपास विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मार्चपर्यंत हा निधी वाटप करणार असल्याचेही ते म्हणाले.