उस्मानाबाद : येथील मदरसा दावतूल उलूम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याच्या सात हजार किट तयार करण्यात आल्या असून, यातील पाच हजार किटचे वाटप जिल्ह्याच्या विविध भागांत करण्यात आले आहे.
समाजातील दानशूर लोकांकडून जकात, खैरात, अतियाची रक्कम जमा करून गरजूंना अन्नधान्य, कपडे वाटप करण्यात येत आहेत. तसेच या माध्यमातूनच संस्थेने गरीब लोकांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शहरातील वैराग रोडवर साराह प्राथमिक व माध्यमिक शाळा व ज्युनिअर काॅलेजही स्थापन केले आहे. येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात असल्याची माहिती संस्थेचे सचिव पैगंबर जिलानी काझी यांनी दिली.
संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या एकूण धान्य किटपैकी दोन हजारांवर किट या उस्मानाबाद शहरात वाटप करण्यात आल्या. तसेच सहारा महाविद्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील या किट देण्यात आल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मोतिचंद राठोड, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, संस्थेचे अध्यक्ष आलिम शेख, रसूल शेख, सामाजिक कार्यकर्ते बाबा फैजोद्दीन आदी उपस्थित होते.