‘आराेग्य’ची काेंडी : ‘बांधकाम’ म्हणते तुमच्या स्तरावर करा ऑडिट
उस्मानाबाद : भंडारा घटनेनंतर इलेक्ट्रीक ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला हाेता. सरकारने सर्व जिल्ह्यांच्या आराेग्य यंत्रणेला रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घेण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार जिल्हा परिषद आराेग्य विभागाने ४२ प्राथमिक आराेग्य केंद्रांचे ऑडिट करून मिळावे यासाठी ‘बांधकाम’ला पत्र दिले. परंतु, त्यांनी उलट टपाली ‘आपल्या स्तरावरूनच एजन्सीकडून ऑडिट करून घ्यावे’, असे कळविले. परंतु, जिल्हास्तरावर अशी एकही एजन्सी नाही. त्यामुळे ‘आराेग्य’ची काेंडी झाली असून ‘काेणी फायर ऑडिट करून देता फायर ऑडिट’, असे म्हणण्याची वेळ ओढवली आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षाला आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला हाेता. यानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांचे फायर तसेच इलेक्ट्रीक ऑडिटचा मुद्दा चव्हाट्यावर आला हाेता. भंडारा घटनेची दाहकता लक्षात घेऊन शासनस्तरावरून तातडीने जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण तसेच प्राथमिक आराेग्य केंद्रांचे ऑडिट करून घेण्याचे फर्मान निघाले. निधीही उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली. त्यानुसार जिल्हा परिषद आराेग्य विभागाने आपल्या ४२ आराेग्य केंद्रांचे ऑडिट करून मिळावे, यासाठी बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रीक विभागाला पत्र दिले. परंतु, त्यांनी मनुष्यबळाचा मुद्दा पुढे करीत उलट टपाली ‘आपल्या स्तरावरूनच एखाद्या एजन्सीकडून ऑडिट करून घ्यावे’, असा सल्ला दिला. हा सल्ला देताना एकही एजन्सी सुचविली नाही. त्यामुळे आराेग्य विभागाची काेंडी झाली आहे. जिल्हास्तरावर अशी एकही यंत्रणा नाही. त्यामुळे ऑडिट करून घ्यायचे काेणाकडून? असे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या सर्व गाेंधळात ऑडिट मात्र रेंगाळले आहे.
चाैकट...
जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रांचे ऑडिट करून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाला पत्रही दिले हाेते. परंतु, त्यांनी उलट टपाली पत्र पाठवून ‘‘आपल्या स्तरावरूनच एजन्सीद्वारे ऑडिट करून घ्यावे’’, असे सुचविले आहे. आम्ही सध्या अशा एजन्सीचा शाेध घेत आहाेत.
-डाॅ. हणमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी.
४२
जिल्ह्यातील आराेग्य केंद्र
००
फायर ऑडिट झाले.