कुत्रा तर भुंकणारच; प्रश्न विचारायचं थांबवायचं नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:04 AM2020-01-13T03:04:32+5:302020-01-13T03:04:48+5:30
संवाद कथालेखकांशी : साहित्यिक, विचारवंतांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कठोर प्रहार
शाहीर अमर शेख साहित्य मंच (उस्मानाबाद) : ज्यांच्याकडे ताकद आहे, त्यांना प्रश्न विचारायलाच हवेत. कुत्रा तर भूंकतोच. म्हणून आपण प्रश्न विचारायचं थांबवायचं नाही. प्रश्न विचारणाºयाला गोळ्या घातल्या तरीही चालतील. मात्र, व्यवस्थेला प्रश्न विचारायचेच, असे परखड मत कथाकार किरण येले यांनी व्यक्त केले.
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी रविवारी सकाळी शाहीर अमर शेख साहित्य मंच येथे ‘संवाद आजच्या लक्षवेध कथालेखकांशी’ हा परिसंवाद पार पडला. या संवादात संवादक म्हणून राम जगताप आणि डॉ. दत्ता घोलप यांनी संवादकांची भूमिका पार पडली. यावेळी बोलताना येले म्हणाले, लेखक जे लिहितील ते परखड असायला हवे. अभिव्यक्तीवर होणारा घाला हा संत तुकारामांच्या काळापासून होत आला आहे. तो त्यावेळी थांबविला असता तर आता इतका वाढला नसता. समाजात त्या-त्या काळात वृत्ती-प्रवृत्ती असणारच. मात्र, लिखाण थांबविणे चुकीचे आहे. प्रश्न विचारण थांबविणं चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आसाराम लोमटे म्हणाले, प्रश्न विचारणार नसाल तर कुतूहल मेले आहे. लेखकाने प्रश्न उपस्थित केले पाहिजे. व्यवस्था ही गेंड्याच्या कातडीची आहे. त्यामुळे टोकदार प्रश्न उभे करणे ही काळाची गरज आहे. सध्या जातीवादाचा संघर्ष तीव्र झाला आहे. मात्र खरे प्रश्न अजूनही दुर्लक्षित आहेत. साहित्यिक बालाजी सुतार म्हणाले, कलावंताचे काम प्रश्न विचारणे आहे. कारण त्यातून अस्वस्थतेला वाट करुन दिली जाते. सध्या सर्वात वेगाने बदलणारा काळ हा सर्व मूल्यांच्या फेरमांडणीचा आहे. कथाकार किरण गुरव यांनीही लेखकांनी त्या-त्या अस्वस्थ वर्तमानाची स्थिती उलगडून सांगितली पाहिजे असे नमूद केले.
सोशल मीडियावरील सर्जनशील साहित्याविषयी बोलताना संजय कळमकर यांनी सांगितले, समाज माध्यमांमुळे आभासी जगात माणूस वावरतो आहे. जागतिक दु:खाची सवय माणसांना लागली आहे. मात्र लेखक या माध्यमामुळे समाजाशी जोडला गेला आहे, हेही वास्तव आहे. यावेळी संजय कळमकर म्हणाले, शिक्षण व्यवस्थेवर खूप प्रयोग केले जात आहेत. तिथे सर्वाधिक फसवणूक होते. शिक्षण व्यवस्थेत संस्कार होत असतील तर समाज बिघडत कसा चालला आहे, याचे चिंतन व्हायला हवे. अजूनही आपल्याकडे गुणांकन मूल्यमापनाची पद्धत ठरत नाही, हे दुर्दैवी आहे.
समाजमाध्यमांवर व्यक्त होणे म्हणजे शीघ्रपतन
कथा लेखक किरण गुरव म्हणाले, समाजमाध्यमांवर व्यक्त होणे म्हणजे शीघ्रपतन असते. त्यावर व्यक्त होण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे. तर बालाजी सुतार म्हणाले, समाज माध्यम ही काळाची गरज आहे. या माध्यमामुळे भाषिक बलस्थान प्रभावी होत असल्याचे माझे निरीक्षण आहे. समाजमाध्यमांवर लिहिणारी माणसं उथळं असतात असे सरसकटीकरण करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.