उस्मानाबाद : एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतानाच उस्मानाबाद शहरात मात्र बेफिकिरपणे जुगाऱ्यानी चांगलाच डाव मांडला होता. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी ख्वाजा नगरात सोमवारी ( दि. २७) रात्री उशिरा धाडसी कारवाई करून तब्बल 17 जुगारी अन 4 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
उस्मानाबाद शहरातील ख्वाजा नगर भागात यापूर्वीच अनेक कोरोना बाधित आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच या भागातील काही अपप्रवृत्तींनी कंटेन्मेंट झोन करताना जोरदार विरोध केला होता. एकीकडे कोरोनाचा असा कहर सुरू असताना याच भागातील एका हॉटेलमध्ये मात्र जुगाराचा डाव मांडण्यात आला. जमावबंदी आदेश असतानाही तब्बल 17 जण याठिकाणी एकत्र जमून जुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलिसांना सोमवारी रात्री मिळाली.
पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपअधीक्षक मोतीचंद राठोड यांच्या सूचनेनुसार शहर ठाण्याचे प्रभारी संदीप मोदे, उपनिरीक्षक दिनेश जाधव, कर्मचारी बिरमवार, गोरे, शिंदे, राऊत, बिदे यांनी या हॉटेलवर धाडसी कारवाई केली.
सोमवारी रात्री उशिरा याठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 17 जुगारी एकत्र बसून जुगार खेळत होते. त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. 17 जुगाऱ्यासह 30 हजार रोख, 5 दुचाकी, 1 रिक्षा, 11 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. क्लब चालक फिरोज इस्माईल शेख हा फरार झाला असून, याप्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.