- बालाजी आडसूळ
कळंब (जि. उस्मानाबाद): दुष्काळामुळे गाव सोडलं...कोल्हापूर शहरातील करवीर नगरीत श्रमातून स्वत:चे नव विश्व निर्माण केलं...हक्काच छोटेखानी घरटं बांधल... परंतु, डोळ्यादेखत घरसंसार पाण्याखाली गेला अन् होत्याचं नव्हतं झालं...कोरड्या दुष्काळाने गाव सोडलेल्या कुटूंबावर पूर परिस्थितीने घातलेल्या घावामुळे मुंकूद कोकाटे या इटकूरकराचा हृद्यविकाराच्या धक्क्याने अंत झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
कळंब तालुक्यातील इटकूर येथील बाबूराव कोकाटे यांना पाच मुले. हाती जेमतेम कोरडवाहू जमीन. यातच दुष्काळ पाचवीला पुजलेला. यामुळे कोकाटे कुंटूबाची उपजिविका भागवली जात नसल्याने त्यांनी थेट कोल्हापूर गाठले. आहे त्या अल्पभू जमिनीवर भागेल या हिशोबाने एक मुलगा गावात थांबला अन् बाकीचे चार भाऊ कोल्हापूरात श्रमजीवी म्हणून मिळेल ते काम करू लागले. यात कोणी पेंटीगच्या तर कोणी सेंट्रीगच्या कामातून स्थिरस्थावर होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या भावंडापैकीच एक असलेल्या मुंकूद बाबूराव कोकाटे.
मुंकूद यांनी कोल्हापूरात आपला जम बसवून कदमवाडी येथील साळोखे कॉलनीत छोटेखानी घरही बांधले होते. याठिकाणी आपला कामधंदा साभांळत मुंकूद यांचा सुखाचा संसार सुरू होता. पत्नी, एक मुलगा व तीन मुली अशा या परिवारासाठी पंचगंगेचा पूर मात्र होत्याचं नव्हतं करून गेला. पंचगंगेचे पाणी रस्त्यावरून घरात येत असतांना पुढे भयाण स्थिती ओढावेल याची पुसटशी कल्पनाही कोकाटे कुंटुबाला नव्हती. परंतु,नकळत दारातल्या पाण्याने घरात अन् घरातल्या पाण्याने छताला पार केले. घरासह संपूर्ण संसार पाण्यात बुडाला. धोक्याची पातळी वाढल्याने मग सुरक्षेसाठी अन्य ठिकाणचे नातेवाईकांचे घर गाठले. पाणी वाढतच असल्याने इथेही त्यांची घराची काळजी लागून राहिल्याने झोप उडाली होती. यातूनच शुक्रवारी पाय पुन्हा घराकडे वळले अन् पाहणीवेळी घर पंचगंगेच्या कव्हेत निपचित पडल्याचे दिसले. कष्टकरी असलेल्या मुंकूद यांच्या साठी हा मोठा धक्का होता. मोठ्या जड अंतकरणाने नातेवाईकांच्या घराकडे परतीचा प्रवास सुरू केला. परंतु, हा प्रवास त्यांच्या जीवनाचा अंतीम प्रवासच ठरला. धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
इटकूरवर शोककळा...कोकाटे कुटुंबाने इटकूर (ता.कळंब) येथील दुष्काळी स्थितीमुळे गाव सोडले होते. यानंतर मोठ्या कष्टाने कोल्हापूरात संसाराचा जम बसवला. परंतु, दुष्काळाने गाव सोडण्याची वेळ आलेल्या कोकाटे कुटुंबातील मुंकूद यांना कोल्हापूरातील ओल्या दुष्काळाने मात्र अचानक ‘एक्झिट’ घ्यावी लागली. यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरात पोटापाण्यासाठी स्थिरस्थावर झालेली इटकूर येथील अशी वीसपेक्षा जास्त कुंटूब आहेत.
पुतणीचे होते उद्या लग्न....मुंकूद यांच्या लगतच विनोद हा भाऊ राहत आहे. या भावाच्या मुलीचे रविवारी लग्नकार्य नियोजित होते. याची आवश्यक ती तयारी ही झाली होती. अचानक ओढवलेल्या पूर परिस्थीतीमुळे हे कार्य नियोजन पुढे ढकलले होते. परंतु, यासाठी केलेली खरेदी व साहित्य पुराच्या तडाक्यात सापडले आहे.