देवधानोरा/रांजणी/नंदगाव : जिल्हाभरात पावसाने उघडीप दिल्यामुळे बहरात आलेली खरीप पिके आता संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी माना टाकत असून, काही ठिकाणी सुरळीत विजेअभावी उपलब्ध पाणीही पिकांना देत येत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
कळंब तालुक्यातील देवधानोरा परिसरात मागील १५ दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनच्या पिकास लागलेली फुले आणि शेंगा पाण्याअभावी वाळून जात आहेत. सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने अनेक कापूस व ऊस उत्पादक शेतकरीही सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. मात्र, १५ दिवसापासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर करत तुषार सिंचनाच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, यातही योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाणी असूनही पीक सुकून जात आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरू असून अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने परिसरातील नदी नाले तलाव कोरडेठाक आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, कळंब तालुक्यातील रांजणी परिसरात देखील पावसाअभावी पिकांची स्थिती चिंताजनक बनली असून, लवकर पाऊस न झाल्यास पिके हातची जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चौकट.......
...तर पिके हातची जाण्याची भीती
तुळजापूर तालुक्यातील नंदगावसह बोरगाव, सिंदगाव, लोहगाव, सलगरा मड्डी, कुनसावळी, बोळेगाव या परिसरात पावसाअभावी खरीप पिकांसह सोयाबीन धोक्यात आले आहे. सध्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनी मार्केटमध्ये सोयाबीनला ११ हजार २०० तर लातूर मार्केटमध्ये १० हजार ८०० रुपये दर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनवर अनेक स्वप्ने रंगविली. मात्र, पावसाअभावी पीक संकटात सापडले आहे. दोन-तीन दिवसात पाऊस नाही झाल्यास पीक हातचे जाण्याची भीती शेतकरी दशरथ काटे, परमेश्वर बेट्टी, माजी उपसरपंच कमलाकर तुप्पे, धुळप्पा कलशेट्टी, सर्वानंद चिनगुंडे, दत्तात्रय पांचाळ, चंद्रकांत मडोळे, तम्मा कांबळे, दासू राठोड, सातलिंगप्पा करंडे, साधू वाघमारे, हुवान्ना गुड्डे आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.