महिनाभरात ४३९ जणांवर उगारला कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:33 AM2021-03-31T04:33:42+5:302021-03-31T04:33:42+5:30
भूम : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरासह फिजिकल डिस्टन्सबाबत प्रशासनाकङून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु, नागरिक मात्र ...
भूम : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरासह फिजिकल डिस्टन्सबाबत प्रशासनाकङून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु, नागरिक मात्र बेफिकीरपणे वागत असून, प्रशासनाने आतापर्यंत अशा ४३९ जणांवर कारवाई करून ७७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.
मागील दोन महिन्यांपासून सर्वत्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व आठवडी बाजार बंद, प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू यासह इतर नियम लागू केले आहेत. हे नियम मोडणाऱ्यांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. यासाठी भूम तालुक्यात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशनुसार तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तैनात करण्यात आलेली आहेत. या पथकात महसूलचे नायब तहसीलदार, नगर परिषद कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका पथकात १ नियंत्रक, तीन सहाय्यक कर्मचारी आहेत. या आठ पथकांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. आतापर्यंत ४३९ जणांवर कारवाई करून ७७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.
कोट......
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याने पुन्हा लॉकडाऊनची भीती आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, यासाठी प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.
- उषाकिरण श्रृंगारे, तहसीलदार