उमरगा (जि.उस्मानाबाद) : ग्रामपंचायत निवडणुकीत एका पक्षाच्या पॅनलकडून निवडून आलेले असताना दुसरीकडे जाऊन सरपंचपद भूषवीत असलेल्या महिला सदस्याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मतदारांनी शुक्रवारी उमरगा तहसीलदारांकडे केली आहे. हा प्रकार आपल्या मताचा अवमान करणारा असल्याची भावना त्यांनी या मागणीद्वारे मांडली आहे. नुकत्याच झालेल्या जवळगाबेट ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक
तीनमध्ये अनुसूचित जातीच्या पुरुषासाठी एक अन् दोन जागा अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होत्या. दोन पॅनलने एकमेकांच्या विरुद्ध उमेदवार उभे केले होते. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वंचित ग्रामविकास पॅनलने प्रभाग क्रमांक तीनमध्ये तीन उमेदवार उभे होते. आम्ही निवेदनकर्ते वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहोत. त्यामुळे आम्ही या पॅनलमधून तानाजी शिंदे, उषा गायकवाड, लक्ष्मी झाकडे या तिन्ही उमेदवारांना वंचितचे उमेदवार म्हणून मतदान करून निवडून दिले; परंतु सदस्य लक्ष्मी झाकडे या विरोधी काँग्रेसच्या गोटात गेल्या अन् सरपंच झाल्या. आम्ही मतदारांनी वंचितचे उमेदवार म्हणून मतदान केले होते; पण झाकडे यांनी सरपंचपदासाठी काँग्रेससोबत जाणे हे आमच्या मताचा अपमान आहे. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व काँग्रेस पॅनलमधून निवडून यावे. यास आमची काही हरकत नाही. त्यांनी राजीनामा नाही दिल्यास आम्ही मतदार ग्रामपंचायत कार्यालय व तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा रमेश गायकवाड, तानाजी शिंदे, उषाबाई गायकवाड, शिवाजी गायकवाड, आनंद गायकवाड, व्यंकट गायकवाड, दत्ता गायकवाड, अशोक गायकवाड, राजेंद्र कांबळे, श्याम धनेराव, पात्राबाई गायकवाड, मीनाबाई गायकवाड, रमाबाई गायकवाड यांच्यासह ६८ मतदारांनी दिला आहे.
काँग्रेसकडे नव्हता उमेदवार...
वंचितच्या पॅनलमधून निवडून आलेल्या लक्ष्मी झाकडे यांना १५६ मते पडली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या अंताबाई झाकडे यांना ८९ मते मिळाली. वंचितचे पॅनलचे तीन उमेदवार हे राखीव जागेवर तर काँग्रेसचे सहा उमेदवार इतर प्रवर्गातून निवडून आले होते; मात्र सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सुटले व काँग्रेसकडे या प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने त्यांनी वंचितच्या लक्ष्मीबाई झाकडे यांना आपल्या गोटात घेत सरपंच केल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे.