एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधींचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:32 AM2021-01-03T04:32:15+5:302021-01-03T04:32:15+5:30
उस्मानाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, आयोगाने प्रत्येकाला समान संधी द्यावी, ...
उस्मानाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, आयोगाने प्रत्येकाला समान संधी द्यावी, असे मत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलून दाखविली.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएसीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ वेळेस परीक्षा देता येणार असून, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९ वेळेस ही परीक्षा देता येणार आहे. अनुसूचित जाती-जमातींमधील उमेदवारांना कमाल मर्यादेचा नियम लागू नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात या निर्णयाचे अनेक विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे, तर काही विद्यार्थ्यांनी निर्णय योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांसंदर्भात जाहीर केलेल्या वेळापत्रकाचेच काटेकोर पालन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
अशाप्रकारे होईल संधींची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
समान संधी गरजेची
परीक्षा देण्यासाठी बंधने नसल्याने अनेक विद्यार्थी परिपूर्ण तयारी न करताही परीक्षा देत होते. आता संधी निश्चित केल्या आहेत. हा निर्णय योग्य आहे. मात्र, प्रवर्गनिहाय संधी निश्चित करणे योग्य नाही. प्रत्येकाला समान संधी देणे गरजेचे आहे.
दीपाली शिंत्रे, स्पर्धा परीक्षा उमेदवार
समानता डावलली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यूपीएसीच्या धर्तीवर घेतलेला निर्णय योग्य आहे; परंतु सर्वांना समान संधी असणे गरजेचे आहे. राज्यघटनेप्रमाणे संधीची समानता येथे डावलण्यात आली आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार अभ्यास करीत असतो. त्यामुळे प्रत्येकाला समान संधी हवी.
मारुती माने, स्पर्धा परीक्षा उमेदवार
निर्णयाचे स्वागत
यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवर हा निर्णय घेतला आहे. वाढती स्पर्धा पाहता अशी बंधने असणे आवश्यक आहेत. शासनाने दरवर्षी परीक्षा घेणे गरजेचे आहे. राज्यघटनेनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव संधी देखील योग्य आहेत. या निर्णयाचे स्वागतच आहे.
अक्षय पाचपिंडे, स्पर्धा परीक्षा उमेदवार
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार
संधीमुळे पार्टटाइम जाॅब करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना मोजक्याच संधींत तयारी करावी लागेल, आधी त्यांना भरपूर संधी असल्यामुळे त्यांच्यावर दबाव राहत नव्हता. आता संधी कमी होणार असल्याने दबाव वाढेल.
विशाल राऊत, स्पर्धा परीक्षा उमेदवार