अखेर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; बीड, लातूरसह उस्मानाबाद जिल्हे झाले निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 09:34 AM2022-10-16T09:34:00+5:302022-10-16T09:39:55+5:30

धरणाच्या ४२ वर्षाच्या इतिहासातील हा १६ वा 'ओव्हरफ्लो' आहे. 

Eventually the Manjara Dam project was filled to capacity; Osmanabad districts along with Beed, Latur became rest assured | अखेर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; बीड, लातूरसह उस्मानाबाद जिल्हे झाले निश्चिंत

अखेर मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; बीड, लातूरसह उस्मानाबाद जिल्हे झाले निश्चिंत

googlenewsNext

- बालाजी अडसूळ 

कळंब ( उस्मानाबाद) :  संपूर्ण पावसाळ्यात पाण्याचा येवा धिम्या गतीचा असल्याने मांजरा प्रकल्पाची यंदा 'थेंबे थेंबे तळे साचे' अशी अवस्था अनुभवण्यास मिळाली. अखेर मागच्या आठवडाभरात परतीच्या पावसाने 'इन्फ्लो' दखलपात्र राहिल्याने शनिवारी रात्री प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला, शिवाय रविवारी सकाळी 'ओव्हरफ्लो' झाल्याने दोन गेटमधून ५० क्युमेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गत ४२ वर्षातील प्रकल्पाची ही दुसरी 'हॅट्ट्रीक ' आहे तर सोळावा ' ओव्हरफ्लो' आहे हे विशेष.

बीड,ऊस्मानाबादची सीमा बनून प्रवाही होणार्‍या मांजरा नदीवर धनेगाव ता.केज, दाभा ता.कळंबच्या शिवेवर १९८० साली 'मांजरा प्रकल्प' बांधण्यात आला. बीड, ऊस्मानाबादेत पाणलोट असलेल्या अन् महसुली हिशोबात बिडमध्ये गणला जाणाऱ्या या प्रकल्पाचे 'लाभक्षेत्र' मोजताना मात्र लातूरकरांचा वरचष्मा दिसून असल्याने प्रकल्पावर तिन्ही जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झालेलं असते.  साल २०२० मध्ये २८ ऑक्टोबरला तर गतवर्षी २२ सप्टेंबरला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. तद्नंतर लातूर, कळंब, धारूर, केज, अंबाजोगाई आदी शहरांची तहान भागवून शेतीसाठी आवर्तने सोडत येथील पाण्याचा मोठा वापर झाला होता. याउपरही २२४ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात पावसाळ्याच्या तोंडावर ९० दलघमी पाणीसाठा उपलब्ध होता. पुढं यंदाच्या पावसाळ्यात मात्र अनियमित व विसंगत पर्जन्यमानामुळे अतिशय अल्प स्वरुपात येवा झाला. पात्रातील पाणी तर खंडले नाही अन् तळे पण भरले नाही! अशीच काहीशी स्थिती होती. यामुळे सातत्याने पाणीसाठ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर गत पंधरवड्यात यात सुधारणा होत, शनिवारी रात्री आठच्या सुमारास प्रकल्पाने आपली ६४२ ही पूर्ण संचयी पातळी गाठली. 

दरम्यान, याच काळात पाणलोट भागात पावसाने विश्रांती घेतल्याने येवा अत्यल्प झाला होता. यामुळे रात्रभर २२४.०९३ हा महत्तम पाणीसाठा 'मेंटेन' राहिल्याने लागलीच विसर्ग करण्याची वेळ आली नाही. मात्र, रविवारी पहाटे पाणलोटमध्ये पुन्हा पाऊस झाला, येवा हलला. 

▪️50 क्युमेक्सने विसर्ग सुरू... 
दरम्यान, शनिवारी रात्रभर पाणीसाठा पुर्णक्षमतेने मेटेंन असताना पहाटेच्या पावसाने येवा वाढल्याने मांजरा प्रकल्पात गेट क्र २ आणि ६ हे २५ सेमीने उंचावून ५० क्युमेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या ४२ वर्षाच्या इतिहासातील हा १६ वा 'ओव्हरफ्लो' आहे. 


यापुर्वी कधी झाला 'ओव्हरफ्लो', कधी झाली 'हॅटट्रिक'...  

▪️पुनश्च हॅटट्रिक १९८८ मध्ये प्रथम भरलेला हा प्रकल्प पुढे १९८९ व १९९० असे सलग दोन वर्ष पुर्णपणे भरत 'हॅटट्रिक' केली होती. यानंतर यंदा शनिवारी हा योग जुळला आहे. 

▪️द्विशतकाचा ईतिहास २००५,२००६ सालासह २०१०, २०११ याशिवाय २०१६, २०१७ तसेच २०२० व २०२१ मध्ये सलग दोन वर्ष याप्रमाणे सहावेळा प्रकल्प भरला होता. 

▪️यावर्षी शतकपूर्ती १९९६, १९९८ यासह २०००,२००८  साली ओव्हरफ्लो तर १९८७, १९९२, १९९३,१९९९ व २००७ मध्ये प्रकल्प क्षमतेच्या आसपास पोहचला होता.

Web Title: Eventually the Manjara Dam project was filled to capacity; Osmanabad districts along with Beed, Latur became rest assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.