लोहारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रत्येक व्यक्तीने कंबर कसली पाहिजे. तन-मन-धनाने आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी खंबीरपणे लढले पाहिजे. बेफिकीरपणा आणि बिनधास्तपणाला मुरड घातल्यास कोरोनावर नकीच मात करता येईल, असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून नागरिकांत याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, स्पर्श ग्रामीण रुग्णालय व निवासी अपंग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.सदस्या शीतल पाटील व राहुल पाटील यांच्या पुढाकाराने कोरोना जनजागृती रूट मार्च काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे, जि.प.सदस्या शीतल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, सरपंच यशवंत कासार, ग्रामसेवक डी. आय. गोरे, निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, केंद्र प्रमुख एम. जी. वाघमोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मस्के आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी गावात चालू असलेल्या माझे गाव माझे कुटुंब अभियानांतर्गत सर्वेक्षणाचा आढावा घेऊन सर्व पर्यवेक्षकांनी वेळोवेळी रुग्णांची तपासणी करावी व लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ताबडतोब दवाखान्यात तपासणीसाठी पाठवावे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांशी संवाद साधून लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाही करावी, असे सांगितले.
अफवांना बळी न पडता सर्व कामे बाजूला ठेऊन सर्वांनी आधी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन जि.प.सदस्य शीतल पाटील यांनी केली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे यांनी आपल्या गावात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची काळजी घेऊन गाव कोरोना मुक्त समित्या बळकट कराव्यात तसेच लस घेतल्यानंतर तीन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊ शकतो. हा संभाव्य धोका ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे अवाहन केले. गावातील प्रमुख रस्त्यावर रूट मार्च काढण्यात आला.