उस्मानाबाद : नापिकी, डोक्यावरील कर्जाला कंटाळून वडाचीवाडी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी २७ सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते. या शेतकऱ्याचा आज उपचारा दरम्यान जामखेड येथील रूग्णालयात मृत्यू झाला़
भूम तालुक्यातील वडाचीवाडी येथील शेतकरी महादेव भाऊराव माने (५३) यांनी २७ सप्टेंबर रोजी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी जामखेड (जि. अहमदनगर) येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, उपचार सुरू असताना २ आॅक्टोबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे़ त्यांच्या नावावर केवळ १५ गुंठेच जमीन आहे. सावत्र आईच्या नावावरील २० गुंठे जमिनीची गत महिन्यातच विक्री करुन काही प्रमाणात कर्ज वर्ग केले होते. परंतु नापिकीच्या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.