येणेगूर (उस्मानाबाद ) : नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका ७० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना आज सकाळी उमरगा तालुक्यातील काळनिंबाळा शिवारात घडली़
उमरगा तालुक्यातील दाळींब नजीकच्या शास्त्रीनगर तांड्यावर राहणारे सखाराम वसंत राठोड (वय-७०) यांची काळनिंबाळा शिवारात ८३ गुंठे जमीन आहे़ पावसाअभावी शेतातील विहीर कोरडी पडली असून, खरिपापाठोपाठ रबी हंगामातूनही काहीच हाती लागले नाही़ सततच्या नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सखाराम राठोड यांनी शुक्रवारी पहाटे स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली
घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील, तलाठी विनायक आवारी, गायकवाड, पोहेकॉ विजयानंद साखरे, दिगंबर सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला़ याबाबत धोंडीराम सखाराम राठोड यांनी मुरूम ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली असा परिवार आहे़