कळंब (जि. उस्मानाबाद) : स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर चुकीचे व्याज आकारल्याने तालुक्यातील तब्बल पावणेतीनशे शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वंचित रहावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही चूक दुरुस्त करण्यासाठी आता यंत्रणा कामाला लागली असली तरी शासनाची ही महत्वाकांक्षी योजना ‘फसवी’ ठरविणाऱ्या यंत्रणावर काय कार्यवाही होणार? याकडे लक्ष लागले आहे.
कळंब येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेअंतर्गत दत्तक असणाऱ्या काही गावातील २७६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये चुकीचे व्याज आकारल्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेमध्ये त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत. कर्जमाफीची रक्कम व शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम यामध्ये तफावत येत असल्याने या शेतकऱ्यांना शासनाच्या महत्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेकडे चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर बँकेकडे तसेच प्रशासनाकडे या शेतकऱ्यांनी दाद मागितली.
सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावरील व्याज कमी करुन हे शेतकरी योजनेस पात्र असल्याचे शासनास कळविले. त्यानंतर बँकेने जून २०१८ मध्ये या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यासाठी कागदपत्रेही जमा करुन घेतले. परंतु सहा महिन्यानंतरही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या २७६ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले नाही. परिणामी शेतात उत्पन्न नाही, बँका कर्ज देत नाहीत या कात्रीत हे शेतकरी सापडले आहेत.
दरम्यान, कर्जमाफी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. बँकेच्या चुकीचा फटका बसल्याने हे सर्व शेतकरी कर्जमाफीला तसेच नवीन कर्ज प्राप्तीला मुकल्याचे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळविले. ही कर्जमाफीची प्रक्रिया त्वरीत करावी अन्यथा आत्मदहन करु, असा निर्वाणीचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.
तांत्रीक चुकीमुळे गोंधळ शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज रकमेत पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी नजरचुकीने जास्त रक्कम टाकल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ती चूक दुरुस्त करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रशासनाकडे पाठविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण होईल व संबंधितांना याचा लाभ होईल, अशी माहिती कळंबच्या स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक काळे यांनी दिली.
तर तीव्र आंदोलन छेडूएकीकडे शासन कर्जमाफी झाली असे सांगत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी प्रशासनाकडे खेटे मारावे लागत आहेत. बँकेने चुकीचे व्याज माथी मारल्याने २७६ शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित रहावे लागले. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. या २७६ शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून त्यांना नवीन कर्ज त्वरीत वाटप करावे, अन्यथा या सर्व शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन हाती घेऊ, असा इशारा काँग्रेस (आय) चे जिल्हा सरचिटणीस भागवत धस यांनी दिला आहे.
इतर बँकातही तपासणीची गरज!कळंब येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एका शाखेत कर्जमाफीपासून वंचित राहिलेले २७६ शेतकरी समोर आले आहेत. तालुक्यात कळंब शहरासह मंगरुळ, येरमाळा, आंदोरा या गावात राष्ट्रीयकृत तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकाच्या शाखा आहेत. ढोकी, मुरुमड या ठिकाणच्या राष्ट्रीयकृत बँकेलाही कळंब तालुक्यातील काही गावे दत्तक आहेत. तेथेही हा प्रकार झाला का? याची खातरजमा करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.