शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरील पैसे परस्पर कर्ज खात्यावर वर्ग; बँकेकडून कर्ज वसुलीचा स्थगिती आदेश पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 03:59 PM2019-03-13T15:59:01+5:302019-03-13T16:02:01+5:30
वुसलीचा स्थगिती आदेश असतानाही बँकेकडून त्याची पायमल्ली केली जात आहे.
उस्मानाबाद : बँक ऑफ महाराष्ट्रच्या भूम तालुक्यातील ईट येथील शाखेकडून दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. कृषी कर्जाच्या वुसलीचा स्थगिती आदेश असतानाही बँकेकडून त्याची पायमल्ली केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरील पैसे परस्पर कर्ज खात्यावर जमा करून घेतले जात आहे. तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी बँकेला खरमरीत शब्दात पत्र काढले आहे.
जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे ईटसह परिसरातील दहा ते बारा खेड्यांची मतदार बँक ऑफ महाराष्ट्रच्या एकमेव शाखेवर आहे. येथील शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतली आहेत. कर्जमाफी योजनेत जे पात्र ठरले, अशा शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली आहेत. परंतु, जे पात्र ठरले नाहीत वा ‘ओटीएस’ करू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या नावे कर्ज कामय आहे. दरम्यान, सध्या उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे संबंधित शेतकऱ्यांना हे कर्ज भरणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे. एवढेच नाही तर जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर बँकर्सची बैठक घेऊन शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आदेशित केले आहे.
असे असतानाही महाराष्ट्र बँकेच्या ईट शाखेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जे काही थोडेबहूत पैसे आहेत, ते परस्पर कर्जखाती वर्ग करून घेतले आहेत. त्यामुळे दुष्काळामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना बँक खात्यावर दैनंदिन व्यवहार करणेही कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली होती. यानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी सदरील तक्रारींचे गांभीर्य ओळखून बँक शाखाधिकाऱ्यांना १३ मार्च रोजी पत्र दिले आहे. बँकेकडून शासन निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. बँकेने यापुढे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यातील पैसे परस्पर कर्ज खात्यावर जमा करू नयेत, असेही पत्रात म्हटले आहे.
शेतकऱ्यांना व्यवहार करणे कठीण
कर्जमाफी योजनेसाठी पात्र न झालेल्या शेतकऱ्यांकडे कृषी कर्ज थकित आहे. त्यामुळे यांना नवीन कर्ज मिळालेले नाही. असे असतानाच आता बँकेकडून बचत खात्यावरील पैसे परस्पर कर्ज खात्यावर जमा केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बचत खात्यावरून दैनंदिन व्यवहार करणे कठीण झाले आहे. या प्रश्नाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर गिते यांनी केली आहे.
वरिष्ठ कार्यालयाचे आदेश
ज्या शेतकऱ्यांचे शेती कर्ज जुने व थकित आहे, त्यांच्या बचत खात्यावरील रक्कम कर्ज खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश आमच्या वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसारच सध्या कार्यवाही अनुसरण्यात येत आहे, असे बँक ऑफ महाराष्ट्र ईट शाखेचे शाखा व्यवस्थापक पी. किशन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.