खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:29 AM2020-12-22T04:29:58+5:302020-12-22T04:29:58+5:30
कळंब : एकतर कापूस केंद्र उशरा सुरू झाले. यातच आता कापूस घालायचा असेल तर पिकाची नोंद असलेला सातबारा ...
कळंब : एकतर कापूस केंद्र उशरा सुरू झाले. यातच आता कापूस घालायचा असेल तर पिकाची नोंद असलेला सातबारा किंवा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला पिकपेरा सादर करा, असा अट्टाहास खरेदी केंद्रावर धरला जात असल्याने सोमवारी असंख्य शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली.
यंदा कापसाचा एकरी उतारा निच्चांकी घसरला आहे. यातच बाजारात मिळणारा दर समाधानकारक नाही. यामुळे शासकीय हमीभावाने कापूस खरेदी व्हावी अशी आग्रही मागणी होत होती. तद्नंतर दिनांक १५ डिसेंबर रोजी सीसीआयचे सबएजन्ट असलेल्या कापूस पणन महासंघाचे हसेगाव तालुक्यातील हसेगाव (के) येथील साई जिनिंग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरी येथे हमीभावाने खरेदी करणारे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. उशरा का होईना हमीभावाचा काटा हलल्यानं शेतकरी आनंदात असतानाच आता खरेदी करताना शेतकऱ्यांना हंगाम २०२०-२० मधील कापूस पेऱ्याची नोंद असलेल्या सातबाराची अद्ययावत प्रत किंवा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला तसा पिकपेरा सादर करण्याचा अट्टाहास धरण्यात आला आहे.
यातच अनेक गावातील चालू हंगामातील सातबारे अपडेट नाहीत. याशिवाय तलाठी आम्हाला पिकपेरा देण्याचा अधिकार नाही, अशी सबब सांगत आहेत. दुसरीकडे मात्र यास पर्याय म्हणून ‘स्वयंघोषणापत्र’ देण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांना तलाठी स्वाक्षरीची उपरोक्त कागदपत्रंच द्यावीत, असा दंडक खरेदी केंद्रावर राबवला जात आहे.यामुळे सोमवारी दिवसभर कापूस घालण्यासाठी हसेगाव केंद्रावर दाखल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. कापूस केंद्रावर लागणारा सातबारा अन् पेरा प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी गाव गाठावे लागले. तेथे तलाठी यांच्याशी संघर्ष करावा लागला. यामुळे संतापजनक स्थितीवर मार्ग काढत शेतकऱ्यांसाठी सुलभ पद्धत अवलंबवावी अशी मागणी होत आहे.
चौकट...
दहा हजार क्विंटलचा पल्ला ओलांडला
१५ डिसेंबरला हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी काटा पूजन होऊन दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात खरेदी सुरु झाली. यानंतर पुढील चार दिवसात दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. मात्र, पुढे सहजासहजी न मिळणाऱ्या कागदपत्राची मागणी पुढे आल्याने अडचणी येत आहेत.
कोट......
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परळी येथील विभागीय व्यवस्थापक यांनी १५ डिसेंबर रोजी दिलेल्या पत्रात कापूस पिकाची सातबारावर अद्ययावत नोंद असावी, असे सूचित केले आहे. याचेच पालन करत आहोत. स्वयंघोषणापत्र स्वीकारल्यास व्यापारी त्याचा गैरफायदा घेऊ शकतील.
- बालाजी कटकदौंड, प्रशासक तथा सहाय्यक निंबधक
चौकट......
खरेदी केंद्रावर अचानक जाचक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. तशी कागदपत्रं मिळवण्यासाठी धावपळ करावी लागली. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे संताप व्यक्त केला जात होता.