मुलांच्या बेकारीची कुऱ्हाड पित्यावर; नैराश्यातून संपवली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:29 PM2018-04-27T15:29:03+5:302018-04-27T15:31:26+5:30
शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी का लागत नाही ? या विवंचनेतून नैराश्य आलेल्या एका ६५ वर्षीय पित्याने आपली जीवनयात्रा संपवली.
लोहारा (जि.उस्मानाबाद) : एक मुलगा डीएड आहे तर दुसरा एमएस्सीचे शिक्षण घेत आहे, एवढे शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी का लागत नाही ? या विवंचनेतून नैराश्य आलेल्या एका ६५ वर्षीय पित्याने आपली जीवनयात्रा संपवली. अशोक शामराव मोरे असे मृत पित्याचे नाव असून ते सेवा निवृत्त शिक्षक होते.
लोहारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्शदपुर येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोक शामराव मोरे (वय ६५) यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा प्रविण याचे डीएड झाले आहे तर दुसरा मुलगा अविनाश याचे एमएस्सी सुरु आहे. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन ही त्यांना नोकरी लागत नाही, या चिंतेत मोरे कायम असायचे. यामुळे मागील काही दिवसांपासून ते खूप तणावात होते. यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती.
यातच गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास मोरे घरातुन निघुन गेले. रात्री त्यांच्या कुटूंबानी त्यांचा खूप शोध घेतला मात्र ते सापडले नाही. आज सकाळी परत शोध सुरु केला असता, मोरे यांनी स्वत:च्या शेतात जनावरांच्या गोट्यासमोरील झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी मोरे यांचा मोठा मुलगा प्रविण यांने लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.