तामलवाडी : खरीप हंगामातील पीक काढणीनंतर रिकाम्या झालेल्या शेतात कदमवाडी येथील चार शेतकऱ्यांनी ७५ हजार कोबी रोपाची लागवड करून अडीच लाख रुपये खर्च केला. परंतु, कोबी काढणीला आला असतानाच बाजारात दर घसरले. यामुळे सध्या पन्नास टन कोबी शेतात वाळून जात असून, या शेतकऱ्यांचे कष्ट अन् खर्चही पूर्णपणे वाया गेला आहे. आता नाइलाजास्तव या पिकात जनावरे सोडण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी शिवारात लक्ष्मण शितोळे यांनी ३० हजार, हणमंत कदम यांनी २२ हजार, दत्ता साळुंके यांनी ७ हजार, तर बबन शिंदे यांनी १४ हजार अशी एकूण ७५ हजार कोबी रोपांची जानेवारी महिन्यात लागवड केली होती. याचे उत्तमरीत्या संगोपन करून कोबी जगविला. यासाठी चार शेतकऱ्यांनी अडीच लाखांवर खर्च केला. कोबी काढणीलाही आला. मात्र, महिनाभरापासून बाजारात भाजीपाल्याचे भाव ढासळले असून, कोबीच्या गड्डीला पाच रुपयेदेखील भाव मिळत नसल्याने वाहतूक भाडे, तोडणी मजुरीचा खर्च कुठून करायचा, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. यामुळे सध्या पन्नास टन कोबी तोडणीविना शेतात अक्षरश: कुजून जात आहे.
कष्ट तर वाया गेलेच शिवाय लागवडीचा खर्चदेखील हातात पडत नसल्याने लक्ष्मण दासू शितोळे या शेतकऱ्याने वैतागून दीड एकर कोबीच्या शेतात जनावरे सोडून दिली आहेत. एकूणच भाजीपाल्याचे दर घसरल्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आला असल्याचे दिसून येत आहे.
कोट........
दीड एकर क्षेत्रात तीस हजार कोबी रोपांची लागवड केली होती. यासाठी ठिबक संचासह इतर ७० हजार रुपये आला. परंतु, सध्या बाजारात भाव नाही. यामुळे २५ टन कोबी शेतातच सुकून जात आहे. यामुळे अडीच लाखांचे नुकसान झाले असून, जनावरे पिकात सोडली तरी ते देखील या कोबीला तोंड लावायला तयार नाहीत.
- लक्ष्मण शितोळे, शेतकरी
कदमवाडी
मी साडेतीन एकर क्षेत्रापैकी ३० गुंठे जमिनीत १४ हजार कोबीची रोपे लावली. यासाठी ३० हजार रुपये खर्च केला. परंतु, सध्या व्यापारी १५० रुपये एका बॅगला भाव देत आहेत. यातून एका कोबी गड्ड्याला पाच रुपयेदेखील भाव पडत नाही. कोबी शेतीवरच वर्षभराचा कुटुंबाचा खर्च अवलंबून होता. मात्र, भावाअभावी कोबी शेतात पडून असल्याने आता वर्षभराचा कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आहे.
- बबन शिंदे
शेतकरी, कदमवाडी