महाविकास आघाडी विरुद्ध गाढवे पॅनेलमध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:25 AM2021-01-10T04:25:03+5:302021-01-10T04:25:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाथरुड : भूम तालुक्यातील महत्त्वाची आणि मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाथरुड ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा जोरदार आखाडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरुड : भूम तालुक्यातील महत्त्वाची आणि मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाथरुड ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा जोरदार आखाडा पेटला असून, येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येत महाविकास आघाडी पॅनेल निवडणूक रिंगणात उभे केले असून, त्यांच्याविरोधात भाजपने भूमचे गटनेते संजय गाढवे यांच्या नावाने पॅनेल उतरवले आहे. त्यामुळे या दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
तुळजापूर व शिर्डी या दोन मोठ्या देवस्थानांना जोडणाऱ्या भूम - अहमदनगर रस्त्यावर भूमपासून १८ किलोमीटर अंतरावर पेढ्यासाठी प्रसिध्द असलेले पाथरूड हे गाव वसले आहे. दुग्धव्यवसाय, पेढा, खवा भट्ट्यांमुळे गावाचा झपाट्याने विस्तार झाला असून, सध्या परिसरातील वीस गावांचा दैनंदिन व्यवहार, व्यापार येथूनच होतो. त्यामुळे पाथरुड ही एक मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. येथील ग्रामपंचायतीत दर एक किंवा दोन वर्षांनी सत्तांतर होत आले आहे. गावात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असून, अलिकडील काळात भाजपचाही प्रभाव वाढला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने केलेली विकासकामे व पुढील नियोजन मतदारांसमोर मांडले असून, महाविकास आघाडी पॅनेलकडून विकासात्मक नियोजनावर भर दिला जात आहे. दोन्ही पॅनेलकडून प्रचाराची राळ उठविण्यात आल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
चौकट..
सत्ता स्थापनेसाठी हवेत सहा सदस्य
पाथरुड ग्रामपंचायतीच्या एकूण ४ प्रभागांमधून ११ सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. याठिकाणी ३ हजार २६५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, सत्ता स्थापनेसाठी सहा सदस्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.