उस्मानाबाद जिल्ह्यातील तिन्ही बाधितांचा पहिला अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:30 AM2020-04-18T06:30:44+5:302020-04-18T06:30:59+5:30
त्यात बाधित तिन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी एक चाचणी होणार
उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तीन कोरोनाबाधित रुग्णांचा विलगीकरण कालावधी संपुष्टात आला आहे. यानुषंगाने केलेल्या पहिल्या चाचणीचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा निगेटीव्ह आला आहे. आता आणखी एक चाचणी होणार असून, त्याचाही अहवाल निगेटीव्ह आल्यास जिल्हा कोरोनामुक्त होईल.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात दोघे तर लोहारा तालुक्यातील एकास कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील दोन आठवड्यापासून उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेटेड कक्षात उपचार करण्यात येत होते. त्यांनी उपचारास चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर गुरुवारी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. सोलापूर येथील प्रयोगशाळेत या नमुन्यांची शुक्रवारी तपासणी होऊन रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयास अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात बाधित तिन्ही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बाधित रुग्णांची शनिवारी आणखी एक चाचणी होणार आहे. पुन्हा नव्याने नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले जातील. या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आल्यास संबंधित बाधित हे कोरोनामुक्त झाले, असे म्हणता येऊ शकते. यानंतर त्यांना गृह अलगिकरणात ठेवण्यात येईल.
- डॉ. पंडित पुरी, वैद्यकीय अधीक्षक, कोविड रुग्णालय, उमरगा