सुलभ अध्ययन, अध्यापनासाठी पाच नाविन्यपूर्ण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:45 AM2021-02-26T04:45:40+5:302021-02-26T04:45:40+5:30
फोटो (२४-२) बालाजी बिराजदार लोकमत न्यूज नेटवर्क लोहारा : अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही बाबी सुलभ होऊन शैक्षणिक गुणवत्ता ...
फोटो (२४-२) बालाजी बिराजदार
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही बाबी सुलभ होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या अनुषंगाने लोहारा तालुक्यातील माकणी केंद्राने यावर्षी पाच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा ११ शाळांमधील ३ हजार ५०० विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
गत शैक्षणिक वर्षात माकणी केंद्रातील शाळांची शिष्यवृत्ती परीक्षेतील संपादणूक वाढविण्यासाठी ‘मिशन स्कॉलरशीप २०२०’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत दरमहा अभ्यासक्रम निश्चित करून दरमहा दोन सराव चाचण्या घेतल्या गेल्या. प्रश्नपत्रिका विकसनासाठी केंद्रातील तज्ज्ञ शिक्षकांची समिती नेमण्यात आली. शाळांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उत्तरसूची इत्यादी साहित्य पुरविण्यात आले. पारदर्शकता राहावी म्हणून या चाचण्या घेण्यासाठी दुसऱ्या शाळेतील पर्यवेक्षक नेमले गेले. याचे फलित मुख्य परीक्षेच्या निकालात दिसून आले. त्यामुळे आता चालू शैक्षणिक वर्षातही शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यंदा मिशन स्कॉलरशीप, संदर्भ साहित्याचा संग्रह व वापर, मल्टी स्किल टिचिंग, अध्यापनात टिचिंग व्हाईट बोर्डचा वापर, ॲस्ट्रानॉमिकल क्लब हे उपक्रम राबविले जाणार आहेत. याची माहिती देण्यासाठी केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे यांनी केंद्रस्तरावर नुकतीच कार्यशाळाही घेतली. त्यात तज्ज्ञ मार्गदर्शक गौरीशंकर कलशेट्टी, प्रमोद माने, परमेश्वर भोसले व राजकुमार वाघडोळे यांनी उपक्रमांचे महत्त्व आणि अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे माकणी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या नऊ व खासगी दोन अशा एकूण अकरा शाळेतील साडेतीन हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
फोटो...
लोहारा तालुक्यातील राजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना अवकाश दर्शन घडवताना मुख्याध्यापक दीपक पोतदार, शिक्षक राजकुमार वाघडोळे, बी. डी. शिंदे.