कळंब : शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करूनवीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा. तसेच महावितरणच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी अखिल भारतीय क्रांती सेना पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अगोदरच अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना वीज महावितरण कंपनीने डी. पी. बंद करून शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सरकार हिसकावून घेत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्याची मागणी पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल शेळके, रेवण करंजकर, सतीश मिटकरी, संजय शेळके आदींनी या निवेदनाद्वारे केली आहे.