उस्मानाबाद : महिलेवर सामुहिक अत्याचार केल्या प्रकरणातील तीन आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तर एकाला २७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ही घटना तालुक्यातील बेंबळी शिवारात २६ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती़
याबाबत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आशिष कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील एक महिला २६ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गावच्या शिवारातील शेतात शौचास गेली होती़ त्यावेळी चौघांनी सामुहिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य करून मारहाण केल्याची फिर्याद पीडित महिलेने बेंबळी पोलीस ठाण्यात दिली होती़ पीडितेच्या फिर्यादीवरून विष्णू हरिदास डाके (२१), धनंजय योगीराज रसाळ (२१), बालाजी विलास कांबळे (२०), दादासाहेब भाऊराव जानराव (२१) या चौघांविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
या प्रकरणाचा सपोनि किरण दांडगे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर.औटी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली़ या प्रकरणात ११ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. या प्रकरणात समोर आलेले पुरावे व अॅड़ आशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी आरोपी विष्णू डाके, बालाजी कांबळे, दादासाहेब जानराव यांना प्रत्येकी २२ वर्षे सक्तमजुरी व ५२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ तर आरोपी क्रमांक दोन धनंजय रसाळ यास २७ वर्षे सक्तमजुरी व ५४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावल्याचे अॅड़ कुलकर्णी यांनी सांगितले़