वाशी (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील तांदुळवाडी येथे बुधवारी पहाटेपूर्वी चोरट्यांनी चार घरे फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
तांदुळवाडी येथील जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान संचालक काकासाहेब चौधरी हे मंगळवारी जेवून घरात झोपले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून पाठीमागील दरवाज्यातून बंगल्यात प्रवेश मिळवला. यानंतर चौधरी झोपलेल्या खोलीस बाहेरून ‘लॉक’ करण्यात आले. पहाटेच्या सुमारास उठून ते बाहेर जाण्यासाठी निघाले असता बाहेरून कड्या लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मोबाईलवरून नोकराला फोन करून बोलावून घेतले. श्रीराम मस्के यांनी घरी येऊन त्यांच्या खोलीची कडी काढली.
बाहेर येऊन त्यांनी पाहिले असता घरातील दोन कपाटामधील तसेच बाजूच्या खोलीतील दिवाणमध्ये ठेवलेले ३ लाख ९३ हाजारांचे सोन्याचे दागिने व रोख ४७ हजार रूपये चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याशिवाय चोरट्यांनी गावातील अरविंंद ज्ञानोबा गायकवाड, अरूण तुकाराम उंदरे व शशिकांत रावसाहेब कुलकर्णी यांचीही घरे फोडली. अरविंंद गायकवाड यांच्या घरातील सामान उचकटून १० साड्या व रोख ८ हजार रूपये, पॅनकार्ड व कागदपत्रांची चोरी केली. तर अरूण उंदरे यांच्या घरातील १० साड्या व ४ हजार रूपये रोख व बॅटरी लंपास केली. या प्रकरणी काकासाहेब चौधरी यांच्या तक्रारीवरून वाशी ठाण्यात अज्ञातांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.