वाशी (जि़ उस्मानाबाद) : पैसे चोरीचा आळ आपल्यावर येईल, या भीतीने क्षितिजा शंकर शिंदे (१७) या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी वाशी येथे उघडकीस आली आहे़ याप्रकरणी वाशी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात मुलींचे निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहात ३६५ विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत़ याच वसतिगृहात राहून ११ वी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या क्षितिजा शंकर शिंदे (रा़ बावी, ता़ वाशी) या मुलीने ११ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वसतिगृहातील खोली क्रमांक ४ मध्ये ओढणीच्या साहाय्याने छतास गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, तिच्या खोलीतील तीन मैत्रिणींचे पैसे चोरीस गेले होते़ त्याचा आळ आपल्यावर येईल, या भीतीने तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नोंद केले आहे़ ही घटना प्राचार्यांनी तातडीने पोलिसांना कळवली़ पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली़ मुलीचे नातेवाईक आल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह मुलीच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सहायक निरीक्षक किशोर चोरगे करीत आहेत़रेक्टरचे लक्ष चुकवून केला आत्मघातक्षितिजाच्या खोलीत पैसे चोरीचा प्रकार घडल्यानंतर भेदरलेल्या क्षितिजाच्या काळजीपोटी प्राचार्या डॉ़ शारदा मोळवणे यांनी तिच्या नातेवाईकांना कळवून तिला रेक्टरसोबतच राहण्याची सूचना केली होती़ प्राचार्यांच्या सूचनेप्रमाणे रेक्टर यांनी तिला स्वत:च्या खोलीतच सोबत घेतले होते़ रात्रभर ती त्यांच्याजवळ होती़ रेक्टर सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास प्रात:विधीस गेल्यानंतर क्षितिजा शिंदे हिने तिची खोली गाठत आतून कडी लावून घेऊन ओढणीने गळफास घेतला़ दरम्यान, रेक्टरला आपल्या खोलीत क्षितिजा दिसून न आल्याने त्यांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली असता, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये क्षितिजाचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला़
महाविद्यालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे़ यापुढे अशा प्रकारची कोणतीही घटना अथवा चुकीचे प्रकार घडणार नाहीत, यासाठी महाविद्यालय प्रशासन अधिक सुरक्षेची काळजी तत्परतेने घेत आहे़ -डॉ. शारदा मोळवणे, प्राचार्या