दैवाने तो वाचला, पण कोरोनाने गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:52+5:302021-05-09T04:33:52+5:30
उस्मानाबाद : कोरोनाच्या भीतीने तुळजापूर तालुक्यातील एका तरुणाने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्यातून तो दोन्ही वेळा ...
उस्मानाबाद : कोरोनाच्या भीतीने तुळजापूर तालुक्यातील एका तरुणाने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्यातून तो दोन्ही वेळा बचावला. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने उपचार घेत असताना या तरुणाचा शनिवारी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील एका तीस वर्षीय तरुणाची प्रकृती बिघडली होती. त्याच्या मोठ्या भावाने त्यास ६ मे रोजी आलूर येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तेथील डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे असल्याने अन्यत्र तपासणी करून घेत उपचार घेण्याचा सल्ला त्यांना दिला. उशीर झालेला असल्याने या तरुणास दुसऱ्या दिवशी रुग्णालयात नेता येईल, या विचाराने घरीच आणले. घरात लहान मुले असल्याने काळजीपोटी या तरुणास घराबाहेरच खाट घालून झोपविण्यात आले व कुटुंबीय शेताकडे गेले. भीतीपोटी हा तरुणही त्यांच्या मागोमाग शेताकडे गेला. यावेळी विहिरीवरील विद्युत बॉक्समध्ये हात घालून आत्महत्येचा प्रयत्न त्याने केला. मात्र, नेमकी त्याचवेळी वीज गेल्याने यातून तो बचावला. लागलीच त्याने कोरड्या विहिरीत उडी टाकली. मात्र, येथेही झुडपे असल्याने त्यात अडकला. ही माहिती कळल्यानंतर नागरिकांनी त्यास बाहेर काढले. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. गावचे सरपंच विवेकानंद मिलगिरे यांनी प्रसंगावधान राखून तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली व जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे केलेल्या तपासणीत तो बाधित आढळून आला. तो घाबरलेल्या अवस्थेतच उपचार घेत होता. दरम्यान, ८ मे रोजी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही वाचलेल्या या तरुणाचा अखेर कोरोनाने गळी गेल्याने गावात शोक व्यक्त होत आहे.