उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्यात गुडमॉर्निंग पथकाच्या ३ पथकांद्वारे ३० पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी १५४ जणांवर कारवाई करीत प्राथमिक स्तरावर समज देऊन शौचालयाचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या.
तालुक्यातील कुन्हाळी, मुळज, कदमापूर, दाबका या गावांत सोमवारी भल्या पहाटे गावकूस गाठत उमरगा पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर धडक कारवाई केली. तालुक्यातील एकूण ८० ग्रामपंचायतींमधील ९५ गावे २०११ मध्येच १०० टक्के पाणंदमुक्त झाली आहेत; परंतु अनेक गावांतील ग्रामस्थ शौचालय असूनही त्याचा वापर करीत नाहीत, तर काहींनी शौचालयच बांधले नसल्याने उघड्यावरच जातात. अशा लोकांविरुद्ध उमरगा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड मॉर्निंग पथकाची मोहीम राबवून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या पथकातील गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे एन.एस. राठोड, एस.एम. शटगार, आस्थापना वरिष्ठ सहायक एन.आर. घुमे, ग्रामसेवक एन. डी. श्रीगिरे, एस. एस. चव्हाण, ए. सी. राठोड, पी. एल. माले, जे. एस. गायकवाड यांच्या पथकाने सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक गावात येऊन २० जणांना पकडले, तसेच रविवारी ३ पथकातील ३० कर्मचाऱ्यांनी १३४ जणांना पकडले. त्यांना कॅमेऱ्यात कैददेखील करण्यात आले आहे. पथक पाहताच अनेकांनी धूम ठोकली. या सर्वांना समज देऊन सोडून देण्यात आले.