तेर (जि. उस्मानाबाद) : तेर येथील संत श्री गोरोबाकाका यांच्या घराच्या पडझडीची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांना दिले आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबाकाका यांच्या घराचे (वाड्याचे) माळवद १ नोव्हेंबर रोजी रात्री पडले होते. याबाबत तेर येथील ह.भ.प. दीपक महाराज खरात, ह.भ.प. रघुनंदन महाराज पुजारी आदींसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. संत गोरोबाकाका यांच्या घराच्या बांधकामासाठी जवळपास १ कोटी रुपये पुरातत्व विभागाने खर्च केले आहेत. असे असतानाही वाड्याच्या बांधकामाला तडे गेले आहेत. पावसामुळे छताला गळती लागते. माळवदाच्या लाकडांना कीड लागली आहे. सध्या माळवदाचा सर कोसळला आहे.
या सर्व बाबींचा विचार करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांना या प्रकाराची चौकशी करून कागदपत्रांच्या पुराव्यासह लेखी अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात दोषी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांचे या चौकशीकडे लक्ष लागून आहे.