आशा स्वयंसेविकांना ‘आराेग्य’चा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:29 AM2021-04-03T04:29:10+5:302021-04-03T04:29:10+5:30
लोहारा : आराेग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत अणदूर, पाटाेदा, पाथरूड, ...
लोहारा : आराेग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत अणदूर, पाटाेदा, पाथरूड, जळकाेट या केंद्रांतर्गत कार्यरत आशांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविकांना सन २०१९- २० या आर्थिक वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यासाठी पुरस्कार निवड समितीची बैठक उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये आशा स्वयंसेविकांच्या पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावाची छाननी करून सर्वांत जास्त कामावर आधारित मोबदला मिळवणाऱ्या आशा स्वयंसेविकांची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्या इंदूबाई मोहन कबाडे यांना जिल्हास्तरीय प्रथम, जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कार्यकर्त्या आशा मधुकर गुळवे यांना द्वितीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक प्रथम पुरस्कार अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनुराधा बालाजी पापडे, द्वितीय पुरस्कार भूम तालुक्यातील पाथरूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उषा उत्तम गायकवाड यांना, तर उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आफरीन इसाक पटेल यांना तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. के. के. मिटकरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. किरण गरड, जिल्हा लेखा व्यवस्थापक जीवन कुलकर्णी, जिल्हा समूह संघटक सतीश गिरी उपस्थित होते.
चाैकट...
उस्मानाबाद जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका या आरोग्य विभागाच नाही तर इतर विभागासाठीही एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करीत आहेत. कोविड १९ महामारीमध्ये लोकांपर्यंत अतिशय नियोजनपूर्वक आरोग्य सेवा पोहोचविण्याचे काम आशा कार्यकर्ती यांनी केले आहे.
- डॉ. विजयकुमार फड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., उस्मानाबाद.