तामलवाडी (जि. उस्मानाबाद) - शुक्रवारी रात्री झालेल्या पावसानंतर तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावानजीकच्या ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले असून, यामुळे चालू आठवड्यात तिसऱ्यांदा सांगवीसह पांगरधरवाडीचा संपर्क तुटला आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, सांगवी (काटी), पांगरधरवाडी आदी परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून पाऊसपाऊस झाला. सांगवी-माळुंब्रा बृहत तलावाच्या पाण्यासाठ्यात वाढ होऊन सांडव्यावरून पाणी वाहू लागले. यामुळे सांगवीनजीकच्या ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला असून, सांगवीसह पांगरधरवाडी गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, यापूर्वीही सोमवारी पहाटे व गुरूवारी रात्री हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या पुलाची उंची वाढविण्याबाबत ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा केला जात असून, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पुलानजीकच्या ओढ्यातील पाण्यात आंदोलन करण्याचा इशारा आता गावकऱ्यांनी दिला आहे.