लोहारा, उमरगा, तुळजापुरातील आठ मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:42 AM2019-09-25T11:42:15+5:302019-09-25T11:44:13+5:30
पावसाळा सरत आला असतानाही जिल्ह्यात एकही दमदार पाऊस झाला नव्हता.
उस्मानाबाद - जिल्हयात मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास परतीच्या पावसाने झोडपून काढले. लोहारा, उमरगा आणि तुळजापूर तालुक्यातील जवळपास आठ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पाणी आले.
पावसाळा सरत आला असतानाही जिल्ह्यात एकही दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अनेक गावांत आजही टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या होत्या. असे असतानाच मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास विशेषतः लोहारा, तुळजापूर, उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. लोहारा तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये लोहारा 107 मिलीमीटर, जेवळी 105 मिमी तर माकणी मंडळात 85 मिलीमीटर पाऊस कोसला. यासोबतच तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मंडळात 92 मिमी, सळगरा 140 मिमी तर ईटकळमध्ये 130 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. उमरग्यालाही पावसाने झोडपले आहे. उमरगा शहरामध्ये 88 मिमी तर दाळिंब सर्कलमध्ये 108 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे परिसरातील नदी-नाले वाहते झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान लोहारा शहरातील काही भागातील घरांत पाणी शिरून नुकसान झाले आहे.
भूम, कळंब, परंड्याला प्रतीक्षा...
दुष्काळी तालुका म्हणून ओळख आसलेल्या भूमसह कळंब, परंडा आणि वाशी तालुक्यात मात्र फारसा दखलपात्र पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.