काेराेना काळातील विद्युत बिलांची हाेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:33 AM2021-03-31T04:33:16+5:302021-03-31T04:33:16+5:30
भाजप आक्रमक -महाविकास आघाडी सरकारविराेधात घाेषणाबाजी उस्मानाबाद : काेराेनामुळे शहरी तसेच ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे. लाॅकडाऊनच्या काळात लाेकांच्या ...
भाजप आक्रमक -महाविकास आघाडी सरकारविराेधात घाेषणाबाजी
उस्मानाबाद : काेराेनामुळे शहरी तसेच ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे. लाॅकडाऊनच्या काळात लाेकांच्या हाताला काम नव्हते. अशा काळातील अव्वाच्यासव्वा बिले आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. वीजबिल न भरल्यास कनेक्शन ताेडले जात आहे. महावितरणच्या या भूमिकेविरुद्ध भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी बिलांची हाेळी करण्यात आली.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. या काळात उद्याेग, लहान-माेठे व्यवसाय ठप्प हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना विद्युत देयके भरणे कठीण झाले हाेते. लाॅकडाऊन काळातील ही देयके माफ करावीत, यासाठी भाजपकडून मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, याबाबतीत कुठलाच दिलासादायक निर्णय सरकारने घेतला नाही. उलट याच काळातील थकबाकीदार ग्राहकांचे कनेक्शन ताेडण्याची माेहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. परिणामी भाजपच्या वतीने महावितरणच्या विराेधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार २९ मार्च राेजी जिल्ह्यात विविध भागात आंदाेलन करण्यात आले. तुळजापूर येथील महावितरणच्या कार्यालयात आंदाेलन केले. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजीही केली. या आंदाेलनात भाजपचे बाळासाहेब शामराज, जिल्हा सहकार आघाडी नारायण नन्नवरे, किशोर गंगणे, शिवाजी बोधले, उमेश गवते, राम चोपदार, सचिन रसाळ, ॲड. गिरीश कुलकर्णी, सागर पारडे आदी उपस्थित हाेते.