उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, प्रतिदिन ५०० ते ६०० रुग्णांची भर पडत आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील बेडही फुल्ल झाले आहेत, शिवाय क्रिटिकल रुग्णाची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. सध्या दिवसाला १ हजार १०० ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत असून, रुग्णांना ७४ लाख लीटर ऑक्सिजन लागत आहे. सध्या बफर स्टॉकची सोय नसल्याने काळजीत भर टाकणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घेण्याची वेळ आली आहे. गतवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत होता. यातील बहुतांश बाधितांना श्वास घेण्यासही अडथळा निर्माण होत होता. अशा रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. त्यामुळे दिवसाकाठी २५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत होता. मात्र, दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यात २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे या महिन्यात प्रतिदिन जिल्हा रुग्णालयास ३०० ते ४०० जम्बो सिलिंडर लागत. एप्रिल महिन्यात दिवसाकाठी ५०० ते ६०० रुग्ण आढळून येत आहेत, शिवाय क्रिटिकल रुग्णांचा आकडाही वाढू लागल्याने, जिल्हा रुग्णालयातील ओटू बेड, व्हेंटिलेटर अपुरे पडू लागले आहेत. शनिवारी ४०३ ओटू बेड फुल्ल झाले होतेे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळण्यासाठी वेटिंगवर थांबावे लागत होते, तर दुसरीकडे क्रिटिकल रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. एका जम्बो सिलिंडरची क्षमता ६ हजार ८०० लीटर आहे, असे १ हजार १०० म्हणजचे ७४ लाख ८० हजार लीटर ऑक्सिजन रुग्णांना लागत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये, कोरोनाच्या साथीपूर्वी जिल्हा रुग्णालयास सर्पदंश, अर्धांगवायू, जळीत विद्युत धक्का, मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. त्यामुळे पूर्वी दिवसाकाठी अवघे १० ते १५ सिलिंडर लागत होते.
जिल्ह्यात रुग्णालयात कोविड इमारतीत ४०३ बेडची व्यवस्था आहे. यात ७८ व्हेंटिलेटर बेडची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, शनिवारी रुग्णालयातील सर्वच बेड फुल्ल होते.
ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा रुग्णालयाच्या आवारात १० केएल क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. १० केएल लिक्विड भरल्यानंतर यातून १,३०० ऑक्सिजन सिंलिडर निर्मिती होते. प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो.
पॉईंटर...
कोणत्या रुग्णांना मिनिटाला किती ऑक्सिजन लागतो?
९० ते ९४च्या पुढे ऑक्सिजनची असलेल्या सौम्य लक्षणांच्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास ५ लीटर प्रतिमिनिट पुरवठा केला जातो.
या रुग्णांकरिता हवेतून ऑक्सिजन तयार करणारे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचा उपयोग केला जातो. रुग्णालयातील नेत्र विभागात अशा ५३ मशीन बसविण्यात आल्या आहेत.
शरीरात ९० ते ९५ दरम्यान ऑक्सिजन असलेल्या रुग्णांना नॉन रिब्रेदेबल मास्क द्वारे प्रतिमिनीट १० ते १५ लीटर ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
८० ते ८५ ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांकरिता बायपॅप, व्हेंटिलटरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. बायपॅपद्वारे प्रति मिनिटाला ४० लीटर तर व्हेंटिलेटर ६० लीटर ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
कोट...
रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे दररोज १ हजार १०० ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांकरिता ४०३ ओटूबेडची व्यवस्था केली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी ऑक्सिजन प्लांटही येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येईल, यातून ऑक्सिजनचा बफर स्टॉक उपलब्ध राहण्यास मदत होईल.
डॉ.सचिन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी.
रुग्णांच्या स्थितीवरून प्रतिमिनीट १० ते ६० लीटर ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असतो. सरासरी एका रुग्णास चार ते पाच दिवस ऑक्सिजनची आवश्यकता लागते. रुग्णालयात ६ हजार ८०० लीटर क्षमतेचे प्रतिदिन १,१०० जम्बो सिलिंडरचा लागत आहेत. क्रिटिकल रुग्णांना बायपॅप व व्हेंटिलरद्वारे ऑक्सिजन पुरवठा होत आहे.
डॉ.सतीश आदटराव, भूल तज्ज्ञ