विद्यार्थ्यांना मारहाण होत असेल तर शांत बसणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 06:18 AM2020-01-11T06:18:08+5:302020-01-11T06:18:29+5:30
समाजाला वारंवार वेठीस धरले जात आहे.
- प्रज्ञा केळकर-सिंग
संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : समाजाला वारंवार वेठीस धरले जात आहे. विद्यार्थी सरस्वतीचे पूजक असतात. अश्राप विद्यार्थ्यांना एकाकी गाठून मारहाण करणे कोणत्या संस्कृतीत, धर्मग्रंथात सांगितले आहे, असा प्रश्न उपस्थित करत, आमच्या मुलांना मारहाण होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही, मग तुम्ही आमचे काहीही करा, अशा शब्दांत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी जेएनयूमधील घटनेवर ठणकावले. धर्म, जात, पंथावरून भेदभाव करणे हे अमानुषपणाचे लक्षण आहे. ज्या भारतात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या, अशी हीन भारतीय संस्कृती आम्हाला शिकवू नका. आम्हाला संतांची संस्कृती शिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.
९३व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले. तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक गोंधळाने सोहळ्यास सुरुवात झाली. डॉ. अरुणा ढेरे यांनी फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, लक्ष्मीकांत देशमुख, नागनाथ कोतापल्ले, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधानातील मूल्यांची पायमल्ली, पर्यावरणाचा ºहास, मातृभाषेतून शिक्षण, प्रकाशन व्यवसाय अशा अनेक मुद्यांना स्पर्श केला. तरुणांना काही काळ फसवता येईल, त्यांची दिशाभूल करता येईल. मात्र, ही धुंदीही हळूहळू उतरते. दुसऱ्यांच्या द्वेषावर आपले जीवन, राजकारण अवलंबून असते तेव्हा जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. सध्या देशासमोर आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पर्यावरणाचा ºहास हे प्रश्न आहेत. प्रगती करताना मूल्यांचा विसर पडता कामा नये, याकडे दिब्रिटो यांनी लक्ष वेधले
दिब्रिटो म्हणाले, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझी अनपेक्षित निवड झाली. मग, अनपेक्षित टीका झाली तर का घाबरायचे? संतांनी माझा अध्यात्मिक पिंड पोसला. मी येशू ख्रिस्ताचा सेवक आहे. ते काय करतात, त्यांना कळत नाही, त्यांना क्षमा कर, असे येशूने मला सांगितले. मी आंदोलनातला माणूस आहे, त्यामुळे भीती मला कधीच सोडून गेली आहे. जे मला विरोध करतात त्याना मी वसईला येण्याचे आमंत्रण देतो. वसई ही देशातील आदर्श प्रयोगशाळा आहे, हे त्यांना पाहता येईल.
आपल्या आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. मात्र, भीती फार काळ टिकत नाही. चुकीच्या गोष्टीविरोधात प्रत्येक माणसाने नैतिक भूमिका घेऊन उभे राहिले पाहिजे. साहित्यिक भूमिका घेतीलच नागरिकांनीही पुढे आले पाहिजे. प्रत्येकाच्या एका हातात धर्मग्रंथ आणि दुसºया हातात संविधान असले पाहिजे. आपापसात न भांडता धर्माधर्मात मैत्री झाली पाहिजे. कारण, बंधुत्व ही देशाची व्यापक
शिकवण आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.
साहित्यिक, राजकारणी यांच्यात द्वैत नाही. राजकारणी राज्याचा कारभार पाहतात. त्यांनी साहित्यिकांचा हात हातात घेऊन पूढे जावे. अनेक संमेलनाध्यक्षांची भाषणे शासनाने छापलेली नाहीत. आता तो प्रकल्प हाती घ्यावा. मुख्यमंत्री मराठीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी मराठी भाषेसंदर्भातील मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी व्यासपीठावरून केली.
‘मी पुन्हा येईन..!’
मला ५ जानेवारीपासून कंबरदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी दवाखान्यात दाखल व्हायला सांगितले. मात्र, हजारो लोक वाट पाहत असल्याने मी इथे निघून आलो. तब्येतीचा त्रास असह्य झाल्यास मला उद्या परत जाण्याची मोकळीक द्या. तब्येत सुधारली की मी पुन्हा येईन, अशी विनंती दिब्रिटो यांनी रसिकांना केली. त्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या
वाक्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
उस्मानाबादची पाण्याची मागणी पूर्ण करा
गरिबी वा कर्जाच्या ओझ्यामुळे उस्मानाबादच्या काही शेतकºयांना दुर्दैवी निर्णय घ्यावे लागले. फडणवीस सरकारने २०१५ साली नेमलेल्या समितीने या जिल्ह्याला ४५० एमएलडी पाणी पुरवण्याची शिफारस केली. नव्या सरकारने अग्रक्रमाने उस्मानाबादची गरज लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती फादर दिब्रिटो यांनी भाषणातून केली.
दिब्रिटो म्हणाले...
शिक्षणाचे माध्यम बदलत आहे. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे वाढत आहे. इंग्रजी ही धनाची भाषा असेल तर मराठी ही मनाची भाषा आहे. ८० टक्के मराठी शाळा ग्रामीण भागात आहेत. त्यांच्या विचाराना, लेखनाला नवे धुमारे फुटत आहेत. मातीशी एकरूप होऊन ग्रामीण भागतील मंडळी व्यक्त होत आहेत. मोठया मंडळींनी त्यांना समजून घेतले पाहिजे.
दुसºयाचे मत विरोधी असले तरी ते मांडण्याचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही स्वत:ची भूमिका पक्की व ठाम असली की आपल्या निराळ्या विरोधी मताची भीती वाटत नाही उलट निराळ्या विचारांचे स्वागत केले जाते अशा प्रकारचा उदारमतवाद हे प्रगल्भतेचे लक्षण आहे अशा वातावरणातच लोकशाही मूल्यांचे संवर्धन होत असते.
मूलतत्ववाद जगभरात डोके वर काढतो आहे. मात्र, हे टिकणार नाही. जगात भिंती नाही, पूल बांधण्याची गरज आहे.
वसुंधरेचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. प्रत्येक साहित्यिकाने पर्यावरणचा सैनिक झाले पाहिजे. माणसे जगली नाहीत तर साहित्य कोण वाचणार? जगण्याचे व्यावहारिकीकरण, अर्थकारण, तुटलेला संवाद हे प्रश्न आहेत. मध्यरात्री हजारो झाडे कापली जातात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण विसरतो का? एकमेकांचे नाते नाकारले तर आपण जगणार कसे? पर्यावरण रक्षणासाठी आपण कटिबद्ध होऊया.
निसर्ग उध्वस्त करून आपल्याला विकास साधायचा नाही, हे ग्रेटाने जगाला ओरडून सांगितले. मानवतेच्या विवेकाची ती वाणी आहे. विकासामुळे मानवी जीवन सुखकर झाले पाहिजे. नैतिकता आणि अध्यात्मिकतेची वनराई उभारली पाहिजे. आपापल्या गावात पर्यावरणाचे सैनिक म्हणून शक्य होईल ते करूया.
> मौन राखणे हा भेकडपणा
नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो, वांशिक शुद्धीकरणाचा निर्णय होतो आणि एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचे स्वरूप येते, तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केली
पाहिजे. हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. मौन राखणे हा भेकडपणा आहे, अशा परखड शब्दांत दिब्रिटो यांनी साहित्यिकांना आवाहन केले. महाश्वेतादेवी, दुर्गा भागवत यांनी घेतलेल्या भूमिकांचे दाखले देत, ज्यांचा समाजमनाला धाक वाटावा, असे किती साहित्यिक आपल्या आजूबाजूला आहेत?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
>राजकारण्यांनी रसिक म्हणून घेतला आनंद
राजकारण्यांना व्यासपीठावर न बसण्याचा पायंडा यंदा पडला आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आ़ सिद्रामप्पा आलुरे, वैजनाथ शिंदे, अर्चनाताई पाटील ही मंडळी व्यासपीठासमोरील रांगेत होती.
>लेखकावर बंधने नकोत
सत्य म्हणजे जणू लखलखती तलवार असते. अनेकांना विशेषत: लोकशाहीच्या विरोधकांना सत्य मान्य नसते. साहित्याच्या निर्मितीसाठी लेखकावर कुठल्याही प्रकारची बंधने नकोत. त्यांच्यावर बंधने येतात, तेव्हा त्यांचे लेखन पोपटपंची होण्याची शक्यता जास्त असते. दुसºयाचे मत विरोधी असले, तरी ते मांडण्याचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. स्वत:ची भूमिका पक्की व ठाम असली की, आपल्या निराळ्या विरोधी मताची भीती वाटत नाही. उलट निराळ्या विचारांचे स्वागत केले जाते. अशा प्रकारचा उदारमतवाद हे प्रगल्भतेचे लक्षण आहे, असेही दिब्रिटो यांनी सांगितले.
>मी उभा आहे, माझे भूत नाही - महानोर
साहित्य संमेलनाला उपस्थित राहू नका, अशा आशयाचा फोन येऊ नही ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर शुक्रवारी संमेलनाला उद्घाटक म्हणून आले. आपल्या भाषणात महानोर म्हणाले की, संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांनी मराठीची सेवा केली आहे़ माझा त्यांना पाठिंबा आहे. त्यांना विरोध कशासाठी? मंचावर महानोरच उभे आहेत, माझं भूत नाही.
>संमेलन आयोजित करणे, हे महामंडळाचे मुख्य काम असते. महामंडळाच्या चार साहित्य संस्था वाङमयीन कार्य आपापल्या भागात करत असतात. इतर भाषिक प्रश्न सोडवण्यासाठी महामंडळ प्रयत्न करतेच. गावोगावी जाऊन निधी गोळा करणे, हे महामंडळाचे काम नाही. संमेलन अधिकाधिक सर्वसमावेशक करण्यासाठी महामंडळ कायम प्रयत्नशील असते. न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा फुले यांना साहित्य संमेलनाला येण्याची विनंती केली होती. जिथे माझ्या शेतकºयांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, तिथे मी का येऊ, असे सांगत फुले यांनी निमंत्रण नाकारले. गेल्या १३५ वर्षात समाजात उलथापालथ झाली. मात्र, शेतकºयांची स्थिती बदलली का, याबद्दल प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.
- कौतिकराव ठाले-पाटील