नळदुर्ग : दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावाला जोडणारा बोरी नदीवरील पूल पुरात वाहून गेला. त्यानंतर याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असून, प्रशासनाकडून मात्र कुठलीच कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावाला संपर्क साधण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्यावरील पूल बोरी नदीच्या पुरात वाहून गेल्याने गावचा संपर्क तुटला. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालेले आहे. पूल वाहून गेल्यापासून गावात वाहनांची ये-जा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी व आबालवृद्धांचे ही अतोनात हाल होत आहेत. सदर पुलाचे बांधकाम तत्काळ करावे यासाठी जिल्हा प्रशासनाने आदेश दिलेले असतानाही संबंधित विभाग मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन सदर पुलाचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
येडोळा गाव बालाघाट डोंगररांगांमध्ये माथ्यावर वसलेले असून, चारही बाजूने डोंगरदरी आहे. अशा या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने गावातील मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण, आबालवृद्धांना दवाखाने करता येत नाहीत. प्रशासनाने तत्काळ पर्यायी व्यवस्था म्हणून बोरी नदीवर के. टी. बंधारा बांधून रस्त्याला जोडणारा पूल बांधावा, अशी मागणी वारंवार ग्रामस्थ करत आहेत.