उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील देवळाली येथील एका शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्याने गावातीलच एका निरक्षर व्यक्तीस अंधारात ठेवून शिपाई म्हणून नेमणूक केली. शिवाय, मागील पाच वर्षांपासून त्याचा पगारही पदाधिकारी उचलत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेतन थांबवून चौकशी सुरु केली आहे.
कळंब तालुक्यातील देवळाली येथील जागृती विद्यामंदिर येथे गावातीलच गुणवंत राऊत या व्यक्तीची तो निरक्षर असतानाही संस्थाचालकांनी शिपाई म्हणून नियुक्ती केली होती. त्यास तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्याकडून मान्यताही घेतली होती. दरम्यान, ही शाळा २०१६ साली २० टक्क्याने अनुदानित झाली. तेव्हापासून नोव्हेंबर २०२०पर्यंत राऊत यांचे २० टक्के वेतन उचलले गेले. यानंतर नोव्हेंबर २०२०पासून शाळेला ४० टक्के अनुदान सुरु झाले. त्याप्रमाणे यापुढे राऊत यांच्या नावे वेतन उचलले गेले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी प्रश्न विचारल्यानंतर चौकशी समितीचे गठन करण्यात आले. या समितीने केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले आहे. गुणवंत राऊत यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे वेतन उचलले गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता कारवाईचा बडगा उचलला जात आहे. तेव्हा या शाळेवर, संस्थेवर नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
सुनावणीनंतर कारवाईचा निर्णय जागृती विद्यामंदिरात नियुक्ती देण्यात आलेले गुणवंत राऊत हे निरक्षर आहेत. राऊत यांना आपली नियुक्ती शाळेवर असल्याचे माहीत नव्हते व त्यांचे वेतन कोणी उचलले हेही माहीत नसल्याचे चौकशीत त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, हे पद रद्द करण्याच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव देण्यात आला असून, २७ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतरच शाळा, संस्थेवर नेमकी काय कारवाई अनुसरायची, याबाबत निर्णय घेण्यात येईल.-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी