ॲक्शन मोडमुळे वाढले डिटेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:24 AM2021-01-10T04:24:52+5:302021-01-10T04:24:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक शोषित, पीडित नागरिक हा माझ्या घरातील सदस्य आहे... तो माझ्या कुटुंबाचाच एक ...

Increased detection due to action mode | ॲक्शन मोडमुळे वाढले डिटेक्शन

ॲक्शन मोडमुळे वाढले डिटेक्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक शोषित, पीडित नागरिक हा माझ्या घरातील सदस्य आहे... तो माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे... तो माझा मुलगा आहे, माझी मुलगी, भाऊ, बहीण, आई-वडील आहेत. हीच संवेदना पोलिसांच्या मनात रुजविल्याने वर्षभरात कामगिरीचा आलेख चांगलाच उंचावला आहे. एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर कुटुंबावरच आघात ठरणारे अपघात एकीकडे घटल्याचे दिसत असतानाच दोष सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यातही पोलीस दलाला यश आले आहे.

गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलाकडून चमकदार कामगिरी झाली आहे. चोऱ्या-घरफोड्यांचा छडा लावतानाच फरार असलेले आरोपी, वॉन्टेड गुन्हेगारही मोठ्या संख्येने पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यात विशेष दखलपात्र बाब म्हणजे एकीकडे वाहनांची संख्या, वर्दळ वाढत असताना अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. २०१९ साली जिल्ह्यात एकूण ७०६ अपघात झाले होते तर २०२०मध्ये ही संख्या ५६९ आहे. म्हणजेच गतवर्षी व त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत १३७ अपघात कमी झाले. हे प्रमाण २१ टक्के इतके कमी आहे. यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरुन चालकांमध्ये जनजागृतीचा उपक्रम राबविला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना धडाही शिकवला. बैलगाड्या, ट्रॅक्टर व अन्य वाहनांवर रिफ्लेक्टर बसवले. उत्सवांमध्ये जनजागृतीची मोहीम राबवली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

राज्यात उंचावला आलेख...

उस्मानाबाद जिल्ह्याने दोष सिद्धीकरणात चांगलीच आघाडी घेतली आहे. २०१९मध्ये डिटेक्शनचे प्रमाण २३.५५ टक्के इतके होते. ते २०२०मध्ये १० टक्क्यांनी वाढून ३३.६२वर पोहोचले. एकंदर राज्याचे हे प्रमाण २१ टक्के आहे. गुन्हा करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा मिळायलाच हवी व पीडितांना न्याय मिळायलाच हवा, ही भावना ठेऊन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी पैरवी अधिकाऱ्यांना अभ्यासाची सवय लावली. गुन्ह्याचा पूर्ण अभ्यास करुन न्यायालयात वेळेवर आरोपी, साक्षीदार हजर ठेवण्याची सूचना त्यांनी केल्याने युक्तीवाद चांगला झाला अन् त्याचे हे फलित मिळाले.

रौशन यांनी रुजविला मानवी दृष्टीकोन....

जिल्ह्यात मागील वर्षभरात बेपत्ता झालेले १०३ पुरुष व २१८ महिला तर अपहरण झालेले ५ पुरुष व २७ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यासाठी पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी आधी तपास अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मानवी दृष्टीकोन रुजविला. आपलीच मुलगी, मुलगा, आई-वडील यापैकी कोणी बेपत्ता झाल्यास ज्या तडफेने आपण त्यांचा शोध घेतो, तीच भावना ठेऊन तपास करण्याच्या सूचना केल्या. यासाठी अजिबात वेळ घालवू नये, अशी सूचना त्यांनी केली होती. तसेच अपघातांच्या तपासामध्येही हीच भावना जागविली. अपघात हा एका व्यक्तीवर नव्हे तर कुटुंबावर आघात करतो. एखादी व्यक्ती कायमची अपंग होते. त्यानंतर त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर जी परिस्थिती बेतते, याची जाणीव करुन दिल्याने कामाला गती आल्याचे पोलीस सांगतात. एरवी रुक्ष भासणाऱ्या पोलीस दलाला फुटलेली ही मानवी दृष्टीकोनाची पालवी सकारात्मकता दर्शविणारी अन् नागरिक व पोलिसांमधील दरी कमी करणारी ठरत आहे.

Web Title: Increased detection due to action mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.