मुरूम : शहर व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या राशींना सुरुवात केली असून, त्यामुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज तीनशे ते चारशे पोते आवक होत आहे. गुरुवारी बाजारात ५०० पोत्यांची आवक विक्रीसाठी आली असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. दरम्यान, दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.
परतीच्या पावसाने परिसरातील खरीप हंगामातील उडीद, सोयाबीन, मूग, तूर आदी नगदी पिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. शासनाकडून मिळालेली मदत तुटपुंजी असली तरी शेतकऱ्यांना संकटात ती मिळाली असल्याने काहीअंशी दिलासा देणारी ठरली आहे. या संकटातून सावरून शेतकऱ्यांनी उसनवारी करून रबीची पेरणी केली. यात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, करडी, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली आहे.
परिसरात सध्या हरभरा काढणीला सुरुवात झाली असून, एकरी दोन क्विंटल उतार पडत असल्याने खर्च जाऊन किमान दोन एकरांत नऊ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मुरूमच्या बाजार समितीत गुरुवारी जवळपास ५०० पोते हरभरा विक्रीसाठी आला होता. हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४४०० ते ४७८५ रुपयांपर्यंत दर मिळाला असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आपला हरभरा विकला. त्यामुळे बाजारात गुरुवारी वर्दळ वाढली होती.
कोट.........
बाजारात गेल्या चार दिवसांपासून हरभऱ्याची आवक वाढली आहे. बाजारात दररोज ४०० ते ५०० पोत्यांची आवक विक्रीसाठी येत आहे. दरही शेतकऱ्यांना परवडेल असा आहे. आतापर्यंत चार दिवसांत २ हजार २०० तर मागील दहा दिवसांत २ हजार पोत्यांची आवक विक्रीसाठी आली आहे. त्यामुळे बाजारात आजपर्यंत ४ हजार २०० पोत्यांची आवक झाली असून, अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकला आहे. शेतकरी, अडते व्यापारी यांच्या सहमतीनेच बाजारात लिलाव पद्धतीने शेतमालाची खरेदी-विक्री होत आहे.
- अण्णासाहेब कुंभार, सहायक सचिव, बाजार समिती, मुरूम
फोटोओळी . मुरुम परिसरात मळणी यंत्राद्वारे हरभऱ्याच्या राशी करताना शेतकरी व शेतमजूर.