सभापतीपदी इंगोले, उपसभापतीपदी जमदाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:45+5:302021-03-26T04:32:45+5:30
तुळजापूर : येथील पंचायत समितीच्या सभापती विमलबाई मुळे व काक्रंबा गणातील उपसभापती शिवाजी गोरे यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर ...
तुळजापूर : येथील पंचायत समितीच्या सभापती विमलबाई मुळे व काक्रंबा गणातील उपसभापती शिवाजी गोरे यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे गुरूवारी पार पडलेल्या बैठकीत नूतन सभापतीपदी भाजपाच्या खुदावाडी गणातील रेणुका भिवा इंगोले तर उपसभापती पदी आपसिंगा गणातील शरद जमदाडे यांची निवड झाली.
पंचायत समितीतील काँग्रेसची सत्ता मोडीत काढल्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्येक सदस्याला संधी मिळावी, यासाठी सभापती मुळे व उपसभापती गोरे यांना पदाचा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. गुरूवारी पंचायत समिती सभागृहात नूतन पदाधिकारी निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी काटगाव गणाचे सदस्य शिवाजी साठे वगळता इतर १७ सदस्य हजर होते. यावेळी भाजपाकडून सभापती पदासाठी खुदावाडी गणाच्या रेणुका भिवा इंगोले तर काँग्रेसकडून अणदूर गणाच्या वैशाली धनराज मुळे यांचे अर्ज प्राप्त झाल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात भाजपाच्या रेणुका इंगोले यांना नऊ तर काँग्रेसच्या वैशाली मुळे यांना आठ मते पडली. उपसभापती पदासाठी भाजपाकडून आपसिंगा गणातील शरद जमदाडे यांना नऊ तर काँग्रेसच्या येवती गणातील सोनाली संदीप बनसोडे यांना आठ मतदान झाले. त्यामुळे सभापतीपदी रेणुका इंगोले तर उपसभापतीपदी शरद जमदाडे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सौदागर तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी सहाय्य केले.