चेतन धनुरे
उस्मानाबाद : संत साहित्याचे पुरेसे आकलन न झाल्यामुळे बुवाबाजीचे प्रस्थ निश्चितच वाढले आहे़ परंतु, ते केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सरकारी यंत्रणेतही बुवा निर्माण झाले आहेत, असे मत विचारवंतांनी संमेलनातील परिसंवादात व्यक्त केले़
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सायंकाळी ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले/वाढते आहे’ या विषयावर परिसंवाद झाला़ अध्यक्षस्थानी सोमनाथ कोमरपंत होते़ यावेळी डॉ़मुरहरी केळे, प्रकाश एदलाबादकर, धनराज वंजारी, मार्तंड कुलकर्णी, सचिन जाधव यांनी आपली मते व्यक्त केली़
डॉ़मुरहरी केळे म्हणाले, संतांनी आपल्या साहित्यातून अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत़ मात्र, काही ढोंगी, बुवाबाजी करणाऱ्या अपप्रवृत्ती या साहित्याचा विपर्यास करुन लोकांची फसवणूक करतात़ किर्तनासाठीही काही लोक लाखाचे बोलतात. अशा धनसंचयी वृत्तीच्या बुवांवर तुकोबारायांनी त्यांच्या कालखंडात आसूड ओढले होते़
प्रकाश एदलाबादकर यांनी काहिश्या हटके पद्धतीने मांडणी करताना इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही खापर फोडले़ या शाळांतून आपल्या संतांच्या भूमीचा इतिहास शिकविला जात नाही़ त्यामुळे संत साहित्य लपले जाईल़ शिक्षणातील ही एक प्रकारची बुवाबाजीच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले़
ज्ञानोबांचे पसायदान, तुकोबांचे साहित्य कोणी समजूनच घेतले नाही़ त्यामुळे लोक कर्मकांडात गुरफटली अन् त्याचाच गैरफायदा घेणारे बुवा समाजात तयार झाल्याचा दावाही एदलाबादकर यांनी केला़ धनराज वंजारी यांनी सरकारी यंत्रणेतील बुवाबाजीवरही शाब्दिक आसूड ओढले़ ते म्हणाले, ज्ञानेश्वरांनी पसायदानात समाज संरचना सांगितली़ मात्र, त्यातील मर्म विसरुन सरकारी यंत्रणेतील लोक ‘जो जे वांच्छिल, तो ते लाहो’ या वाक्याचा विपर्यास करीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत मिळकतीच्या मागे लागले आहेत़ ही सुद्धा एक प्रकारची बुवाबाजीच आहे़ ही बुवाबाजी आकलनातूनही संपणार नसून, त्यासाठी आचरणही आवश्यक असल्याचे वंजारी म्हणाले़
मार्तंड कुलकर्णी यांनी विषयाची मांडणी करताना समाजाच्या स्वैैराचारावर बोट ठेवले़ ते म्हणाले, संतांनी आपले साहित्य हे समाज सुधारणेसाठी निर्मिले होते़ मात्र, तद्नंतरच्या काळात त्याचा विपर्यास करुन बुवांनी समाजाला स्वैर केले़ ज्यांचे चित्तच शुद्ध नाही असे ढोंगी समाजात अंधश्रद्धा पेरत आहेत़ त्यामुळे संतांचे साहित्य घरोघरी पोहोचवून त्याचा खरा मर्म लोकांना सांगण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले़
डॉ़सचिन जाधव यांनी बुवाबाजीला सुशिक्षित, सधन लोकांमुळेच आश्रय मिळत असल्याचा दावा केला़ या व्यक्ती संकटे आली की आधार शोधत ढोंगी, बुवांना शरण जावून त्यात गुरफटतात़ समाजात हेच अनुकरण चालत राहते़ खरे पाहिल्यास यातून बाहेर पडण्याचा मार्ग संत साहित्यात आहे़ मात्र, समाजात उलटी गंगा वाहते आहे़ अध्यक्षीय समारोपात सोमनाथ कोमरपंत यांनी संत साहित्यावर आपले विवेचन करतानाच परिसंवादाचा सार मांडला़ परिसंवादाचे सूत्रसंचालन कमल नलावडे यांनी केले़ आभार एस़डी़ कुंभार यांनी मानले़