उस्मानाबाद : अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून भत्ते लागू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने उस्मानाबादेत सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले़
शहरातील जिल्हा परिषद इमारतीसमोर ‘कोण म्हणंत देत नाही’, ‘आवाज दो- हम एक है’, ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस संघाचा विजय असो’, अशा घोषणा देत शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला़ यावेळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी मागदर्शन केले़ जेलभरो आंदोलनासाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनिसांनी सकाळपासून गर्दी केली होती़ रणरणत्या उन्हातही महिलांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला
त्यानंतर महाराणा प्रताप चौकात घोषणाबाजी करण्यात आली़ आंदोलनानंतर पोलिसांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ यावेळी महासंघाचे राज्य संघटक दत्ता देशमुख, राज्य सचिव प्रभावती गायकवाड, बापू शिंदे, सुरेखा ठाकूर, सुनिता कदम यांच्यासह शेकडो अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनिसांची उपस्थिती होती़
अशा आहेत मागण्याअंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून, शासनाचे सर्व भत्ते द्यावेत, केंद्र सरकारच्या २० सप्टेंबर २०१८ च्या मानधनात वाढ करण्याच्या अधिसूचनेची अमंलबजावणी विनाविलंब करावी, केरळ, दिल्ली, हरियाणा, तेलंगाणा, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती रक्कम तिपटीने वाढवावी, वर्षातून १५ दिवसांची पगारी, आजारपणाची व उन्हाळ्यामध्ये एक महिन्याची पगारी रजा द्यावी यासह इतर विविध मागण्या जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़