जटाशंकर यात्रा महोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:29 AM2021-04-19T04:29:40+5:302021-04-19T04:29:40+5:30
उमरगा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू असल्याने २७ एप्रिलपासून सुरू होणारी तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत ...
उमरगा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू असल्याने २७ एप्रिलपासून सुरू होणारी तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत श्री जटाशंकर देवस्थान यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.
तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात मुळज येथे निसर्ग सौंदर्याने नटलेले, प्राचिन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले श्री जटाशंकराचे हेमाडपंथी मंदिर आहे. येथे वर्षभरात महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. प्राचीन काळापासून येथे गुढीपाडव्या दिवशी मानकरी असलेल्या सोयराप्पा घराण्याच्या वतीने काठीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यानंतर शिवपार्वती विवाह सोहळा, छबिना, काठी व श्रींची पालखी मिरवणूक, भजन, कीर्तन, पोवाडे, भारुडे, जंगी कुस्त्या, महाआरती, महाप्रसाद, आदी धार्मिक, सामाजिक, समाजप्रबोधनपर कार्यक्रम देवस्थान समितीच्या वतीने आयोजित केले जातात. यादरम्यान लाखो भाविकांची गर्दी असते.
दरम्यान, वर्षानुवर्षे सुरू असलेला हा यात्रा महोत्सव मागील वर्षापासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार सध्या मंदिर प्रवेश व दर्शनदेखील बंद आहे. या महोत्सवातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम व विधी ठराविक मानकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे देवस्थान कमिटीने कळविले आहे.