आचारसंहिता लागताच बस, पेट्रोल पंपावरील जाहिराती हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 07:48 PM2019-03-12T19:48:21+5:302019-03-12T19:51:00+5:30
राजकीय बॅनर्स पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हटविणे अपेक्षित आहे. असे असतानाही यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला जुंपावली लागली.
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील पालिकेच्या जागेवर तसेच मालकीच्या जाहिरात फलकावर असलेले राजकीय बॅनर्स, पोस्टर तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी दिवसभर तसेच सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम राबवून जवळपास ६५ बॅनर हटविले.
उस्मानाबाद शहरामध्ये जेथे-जेथे राजकीय व्यक्तींची नावे असलेली फलके आहेत, ते तातडीने काढण्याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी दिवसभर सर्वच झोन क्षेत्रात स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आली. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यवाहीतून सुमारे ६५ बॅनर हटविण्यात आले आहेत. वास्तविक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग, वा बॅनर ज्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे असेल, त्यांनी वा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हटविणे अपेक्षित आहे. असे असतानाही यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला जुंपावली लागली. त्यामुळे यावर होणारा खर्च कोण देणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.
बसेसवरील जाहिरातीही हद्दपार
केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने जनतेसाठी हाती घेतलेल्या योजनांची माहिती एसटी बसेसच्या माध्यमातून गावोगावी पोहोचविल्या जातात. प्रवाशांच्या सहज नजरेस पडतील, असे फलकही स्थानक परिसरात लावलेले असतात. आचारसंहिता लागू होताच महामंडळाने बसेसवरील जाहिरीराती हटविण्यासोबतच योजनांची माहिती देणारे फलकही काढून घेतले आहेत.
पेट्रोल पंपावरील बॅनर उतरविले
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘उज्ज्वला’ सारख्या योजनांची माहिती देणारे फलक पेट्रोल पंपावर लावण्यात आले होते. नगर पालिकेच्या पथकाकडून हेही फलक सोमवारीच हटविण्यात आले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात अनेक पेट्रोल पंपांवर हे फलक पहावयास मिळाले.