कळंब : कळंब तालुक्यातील कळंब-मोहा-येडशी या राज्यमार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, हा रस्ता बांधकाम विभागाच्या गिनतीत आहे का नाही? असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांतून तसेच वाहनधारकातून विचारला जातो आहे. जंपिंग ट्रॅक म्हणून ओळखला जाणारा हा राज्यमार्ग आता दुरुस्ती व नूतनीकरणाअभावी जास्त अपघातप्रवण झाला आहे.
कळंब तालुक्यातील कळंब-मोहा-येडशी हा ३० किलोमीटर अंतराचा राज्य मार्ग सध्या पूर्णतः उखडून गेला आहे. हा राज्यमार्ग आहे की शेतरस्ता असा प्रश्न यावरून नव्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पडतो आहे. या राज्यमार्गांवरून २५ ते ३० गावांचा दररोजचा राबता आहे. शिक्षण, आरोग्य, बँकिंग तसेच तालुका व जिल्हा पातळीवरील शासकीय कामासाठी हाच मार्ग या गावातील नागरिकांना वापरावा लागतो.
मागील पाच ते सहा वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दरवर्षी पॅचवर्कच्या नावाखाली बांधकाम विभाग लाखो रुपये कंत्राटदारांची बिले काढते. ती कामे प्रत्यक्षात होतात का नाहीत हा संशोधनाचा विषय असला तरी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे मात्र हाल थांबताना दिसत नाहीत.
मागील वर्षी या रस्त्याचा विषय या मार्गावरील काही गावातील मंडळींनी थेट राज्याच्या बांधकाम सचिवांच्या समोर मांडला होता. त्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने काही भाग दुरुस्तही केला. परंतु, त्याचा दर्जा व्यवस्थित नसल्याने ते काम आज अस्तित्वात नसल्याचे दिसत आहे.
या मार्गाच्या कामाचा प्रश्न आला किंवा नागरिकांनी आंदोलन केले की बांधकाम विभाग लिपापोती करते. परंतु, पुन्हा रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ होताना दिसते. ही डागडुजीची कामे करण्याऐवजी रस्त्याची दर्जोन्नती करून रस्त्याचे नूतनीकरण करा, अशी या मार्गावरील नागरिकांची मागणी आहे. परंतु, त्याकडे ना बांधकाम विभाग लक्ष देते आहे ना लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत आहेत.
चौकट -
निधीचे नियोजन करण्याची आवश्यकता
कळंब तालुक्यातील महत्त्वाचे मार्ग आता इतर यंत्रणांकडे हस्तांतरित झाले आहेत. माजलगाव-केज-कळंब-कुसळंब हा राज्यमार्ग खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचा भाग बनला आहे. कळंब-लातूर तसेच कळंब-ढोकी-तेर हे राज्यमार्ग हायब्रीड ॲन्युटी या योजनेतून होत आहे. दरवर्षी कोटीच्या घरात खर्च होणारे हे रस्ते आता बांधकाम विभागाकडे खर्चासाठी नसल्याने त्या मार्गावरील बजेट आता तालुक्यातील इतर राज्यमार्गावर खर्चण्यासाठीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. त्या निधीचे नियोजन केले तर इतर राज्यमार्गांची अवस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे.
चौकट -
यंदा पॅचवर्कही नाही !
या मार्गाच्या डागडुजीसाठी दरवर्षी बांधकाम विभाग पॅचवर्कचा सोपस्कार पार पाडते. यंदा कळंब ते तांदुळवाडी या ५ किमी भागातील काही भाग व शेलगाव ज ते येडशी या दोन किमी भागातील काही भागात पॅचवर्कचे काम बांधकाम विभागाने केले. त्यामुळे हा रस्ता बांधकाम विभागाने गृहीत धरणेच सोडले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
चौकट -
लवकरच कामे सुरु होतील
उपविभागीय अभियंता
या मार्गावरील काही कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, ती कामे लवकरात लवकर हाती घेण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिल्या आहेत. इतर भागांचीही कामे मंजुरीसाठी प्रस्तावित असून, निधी उपलब्ध होताच ती कामेही हाती घेतली जातील, अशी माहिती कळंब सा. बां. उपविभागाचे प्रभारी उपअभियंता सतीश वायकर यांनी दिली.
चौकट -
किती भाग झाला आहे खराब
या ३० किमी राज्यमार्गावरील तांदुळवाडी ते खेर्डा खामसवाडी रोड, मोहा गाव ते पुढे येडशी पर्यंतचा रस्ता वापरण्यास योग्य राहिला नाही. विशेष म्हणजे मोहा येथील गूळ पावडर कारखाना तसेच पुढील चोराखळी व तडवळा येथील कारखान्यासाठीही या मार्गांवरूनच परिसरातील ऊस वाहतूक होते. त्यामुळे हा रस्ता मजबूत व रुंद करण्याची मागणी शेतकरी वर्गातूनही पुढे येते आहे.